मनोज परब यांची एकला चलो भूमिका, राष्ट्रीय पक्षावर डागली तोफ
प्रतिनिधी/ पणजी
म्हादई नदीला वाचविण्यासाठी सर्व विरोधी पक्षाचे नेते एकत्र येऊन जनआंदोलन उभारण्याची तयारी करीत असतानाच ‘आरजी’चे नेते मनोज परब यांनी एकलो चला भूमिका घेत आज रविवार 15 रोजी पिसुर्लेत संध्याकाळी साडेपाच वाजता म्हादई बचावासाठी सभा घेणार असल्याचे सांगितले. पाटो-पणजी येथील आरजीच्या कार्यालयात काल शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
काँग्रेस, गोवा फॉरवर्ड पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, आप, तृणमूल, शिवसेना हे राष्ट्रीय पक्ष असून, त्यांची गोव्यात एक तर कर्नाटक व इतर राज्यात दुसरी भूमिका दिसत आहे. त्यांचे नेते कर्नाटकच्या बाजूने व्यक्तव्य करून म्हादईवर दावा करीत आहेत, तर गोव्यात एकजूट दाखवत आहेत. आम्हाला अशा पद्धतीचे राजकारण करायचे नसून, केवळ म्हादई वाचावी, गोव्याला तिच्यापासून कुणीही वेगळे करू नये, यासाठी ‘टुगेदर फॉर म्हादई मुमेंट’ या झेंड्याखाली आम्ही जनजागृती करीत आहोत, असे परब म्हणाले.
पिसुर्ले येथे रविवारी संध्याकाळी साडेपाच वाजता सभा घेण्यात येणार असून, या सभेला थोर शास्त्रज्ञ व म्हादईचे अभ्यासक डॉ. नंदकुमार कामत हे मार्गदर्शन करणार असल्याचे परब यांनी सांगितले. गोवाच्या हितार्थ नेहमीच आमची भूमिका राहिली आहे. यापूर्वी ‘पोगो बिल’, बेकायदा स्क्रॅप यार्ड, परप्रांतीय लोकांचे बेकायदेशीर वास्तव्य आदी गोष्टींसाठी आरजीची स्वतंत्र भूमिका राहिला आहे. म्हादईबाबतही आमची स्वतंत्र भूमिका राहील. राष्ट्रीय पक्ष निवडणुकीवर डोळा ठेवून विषय हातात घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला. म्हादई नदी ही गोव्याची अस्मिता आहे आणि तिला कुणीही वेगळे करू शकत नाही. त्यामुळेच डॉ. नंदकुमार कामत हे आम्हाला सभेद्वारे प्रोत्साहीत करणार आहेत, असे ते म्हणाले.
कोपरा बैठकांचे सत्र अवलंबणार
म्हादई नदी वाचविण्यासाठी काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, राष्ट्रवादी काँग्रेस, आप, तृणमूल काँग्रेस, शिवसेना हे जरी म्हादईसाठी जनआंदोलन उभारणार असले तरी आम्ही त्यात सहभागी होणार नसल्याची भूमिका मनोज परब यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली. ‘टुगेदर फॉर म्हादई मुमेंट’ या झेंड्याखाली आपण म्हादईचा विषयावर लढणार असून, यामध्ये कोणताही राजकीय स्वार्थ नसल्याचे परब यांनी सांगितले. राष्ट्रीय पक्षांची म्हणजे गोव्यातील विरोधी पक्षांची भूमिका म्हादईसाठी जरी एक असली तरी इतर राज्यांत त्यांची दुसरी भूमिका दिसते. त्यामुळेच आम्ही स्वतंत्रपणे म्हादईचा विषय मांडणार असल्याचे परब यांनी सांगितले. म्हादईला वाचविण्यासाठी गावागावात कोपरा बैठकांचे सत्र अवलंबणार असल्याची माहिती परब यांनी दिली.









