अनेक गोमंतकीयांनी आरजीला निधी दिला त्याचा हिशोब आधी द्यावा नंतर काँग्रेसवर टीका करावी- विजय भिके
प्रतिनिधी /म्हापसा
रिव्होल्युशनरी गोवन्स (आरजी) तसेच निवडणुकीच्या चार महिन्यांपूर्वी अळंबी सारखा उगवणाऱया काही राजकीय पक्षामुळे काँग्रेस पक्षाला या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळू शकले नाही असा आरोप करीत काँग्रेसचे उत्तर गोवा माजी जिल्हाध्यक्ष तसेच नेते विजय भिके यांनी केला. त्यांनी ‘आरजी’ पक्षावर खडबडून टीका केली. मंगळवारी म्हापशात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुळात आरजी ही भाजपची बी टीम आहे. भाजपकडून निधी घेऊन ते स्वतःची राजकीय पोळी भाजत असल्याचा आरोप यावेळी भिके यांनी केला.
यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष विरेंद्र शिरोडकर, प्रणव परब, आसिफ उपस्थित होते. तसेच आरजी पक्षाला अनेक गोमंतकीयांनी निधी दिला त्याचा हिशोब आधी आरजीने सार्वजनिक करावा. नंतरच काँग्रेस पक्षावर टीका करावी असे आवाहन भिके यांनी यावेळी केले.
विजय भिके म्हणाले की, आरजी पक्ष हा केवळ तोंडाच्या बाता मारतो, प्रत्यक्ष काम करीत नाही. त्याउलट काँग्रेस पक्ष नेहमीच लोकांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरतो. मध्यंतरी कोविडच्या काळात असो किंवा महागाईबाबत काँग्रेसने नेहमीच सरकारला धारेवर धरले. तेव्हा आरजी कुठे होता? असे ते म्हणाले.
काँग्रेसने सदैव राज्यातील मुद्दे उचलून धरले
तसेच म्हादई नदीचा विषय, कोळसा प्रश्न, बेराजेगारीचा मुद्दा यासारखे गोव्याचे नानाविध प्रश्नांवर आरजीने कधीच समोर येऊन सरकारला घेरले नाही. फक्त काँग्रेस पक्षानेच हे मुद्दे उचलून धरले व भाजपा सरकारवर टीका केली. असा दावा करीत भिकेंनी आरजीवर निशाणा साधला. मुळात प्रादेशिक राजकीय पक्षाला वोट शेअर नाही, उलट ते धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी करतात असा दावा भिकेंनी केला. अशावेळी निवडणुकीत फक्त भाजपा व काँग्रेस या दोन्हीच पक्षानी निवडणूक लढायची का? असे विचारले असता भिके म्हणाले की, लोकशाहीत व संविधानाने प्रत्येकास निवडणूक लढण्याची संधी दिली आहे असे त्यांनी सांगितले.
काँग्रेसच्या आठ आमदांवर प्रश्न विचारला असता भिके म्हणाले की, मुळात पक्षांतर विरोधी कायदा हा गोवामुळे अस्तित्वात आलेला. या कायद्यात काही त्रुटी असल्याने सध्या भाजपावाल्यांचे आयते फावत असल्याचे भिके म्हणाले.









