लाखो रुपयांचा निधी पाण्यात : कचरा उचलीवर परिणाम, रिडिंग मशीन्सदेखील कुचकामी
बेळगाव : कचरा संकलन आणि विल्हेवाट प्रक्रियेला डिजिटल टच देण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरातील घरांवरील आरएफआयडी (रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन डिव्हाईस) टॅग निष्क्रिय झाल्याने स्वच्छ शहराच्या स्वप्नावर पाणी फेरले आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत बेळगाव शहराची निवड झाल्यानंतर 2018 मध्ये स्मार्ट सिटी लिमिटेडकडून 33 लाख रुपये खर्चून बेळगाव शहरातील 1 लाख 10 हजार घरे, दुकाने आणि व्यावसायिक आस्थापनांवर आरएफआयडी टॅग चिकटविण्यात आले होते. घरांच्या भिंती किंवा कंपाऊंडवर पीडीआय (मालमत्ता क्रमांक) क्रमांकासाठी हा एक टॅग जोडण्यात आला होता.
कचरा गोळा करण्यासाठी घरोघरी येणाऱ्या सफाई कामगारांकडून आरएफआयडी
टॅगजवळ थांबून त्याची नोंद करावी लागत होती. शिवाय संबंधित घरातून कचरा उचलला जात असल्याची खात्री देखील केली जात होती. त्यामुळे कचऱ्याची उचल सफाई कामगारांना कटाक्षाने करावी लागत होती. मात्र, आता तोच टॅग व्यवस्थित काम करत नसल्याने काही वर्षांपासून व्यवस्थितरित्या कचरा उचल होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग पडलेले दिसून येत आहेत. दोन वर्षांपूर्वी बसविलेला आरएफआयडी टॅग निष्क्रिय झाला असल्याने डेटा गोळा करणाऱ्या रिडिंग मशीन्सदेखील कुचकामी ठरल्या आहेत. त्यामुळे लाखो रुपये खर्ची घालून राबविण्यात आलेली ही योजना फोल ठरल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. याकडे स्मार्ट सिटी आणि महापालिकेने लक्ष घालून पुन्हा आरएफआयडी टॅग्ज सुरू करावेत, अशी मागणी केली जात आहे.
समस्या सोडविण्याच्या सूचना करणार
स्मार्ट सिटीच्या अनुदानातून आरएफआयडी टॅग बसविण्यात आले होते. ते व्यवस्थितरित्या काम करत नसल्याने बंद पडले आहेत. त्याचबरोबर कचरावाहू ऑटो टिप्परमध्ये बसविलेले जीपीएस देखील व्यवस्थितरित्या काम करत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे ही वाहने स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देऊन समस्या सोडविण्याच्या सूचना केल्या जातील.
– शुभा बी. (मनपा आयुक्त)









