खराब हवामानाच्या काळात होणार मदत : केंद्र सरकारचे सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमरनाथ यात्रेला शनिवारपासून प्रारंभ झाला असून यात्रेदरम्यान भाविकांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी मोठ्या सुरक्षा सुसज्जतेपासून ते रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (आरएफआयडी) टॅगपर्यंत सर्व उपाययोजना केंद्र आणि जम्मू-काश्मीर प्रशासनाकडून केल्या जात आहेत. पवित्र गुहेच्या भेटीदरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने यात्रेकरूंसाठी आरएफआयडी टॅग अनिवार्य करण्यात आला आहे. प्रत्येक भक्ताचे स्थान आरएफआयडी टॅगद्वारे शोधले जाऊ शकते. खराब हवामानाच्या काळात प्रशासन या टॅगचा वापर करून भाविकांना मदत करू शकेल.
यंदा 62 दिवस चालणारी अमरनाथ यात्रा 1 जुलैपासून 31 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. ही वार्षिक यात्रा आतापर्यंतची सर्वात मोठी यात्रा असल्याचे मानले जाते. यात्रेसाठी आतापर्यंत तीन लाखांहून अधिक भाविकांनी नोंदणी केली असून आता ऑफलाईन नोंदणी करण्याची प्रक्रियाही सुरू झाल्याने भाविकांकडून त्याला प्रतिसाद मिळत आहे. अमरनाथ यात्रेसाठी मोठ्या प्रमाणावर सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. त्यात लष्कर आणि पोलिसांव्यतिरिक्त केंद्रीय राखीव पोलीस दल, सीमा सुरक्षा दल, इंडो-तिबेट सीमा पोलीस, सीआयएसएफ आणि इतर सुरक्षा संस्थांचे कर्मचारी समाविष्ट आहेत. पहलगाम आणि बालटाल बेस पॅम्पकडे जाणाऱ्या मार्गावर आणि गुहेच्या मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर शेकडो नवीन सुरक्षा बंकर बांधण्यात आले आहेत. तसेच ड्रोनसह हायटेक पाळत ठेवण्याचे उपायही वापरले जात आहेत.
अमरनाथ यात्रेसाठी दोन तुकड्या रवाना
जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी शुक्रवारी सकाळी जम्मूतील भगवती नगर पॅम्प येथून यात्रेसाठी यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवला. पहिल्या तुकडीमध्ये सुमारे 3,400 भाविकांचा समावेश आहे. सुमारे 4,400 यात्रेकरूंच्या दुसऱ्या तुकडीला शनिवारी भगवती नगर बेस पॅम्पवरून हिरवा झेंडा दाखवण्यात आला.









