पुणे / प्रतिनिधी :
पुणे शहरातील कोथरुड भागातून पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांचा ‘आयसीस’ या दहशतवादी संघटनेची उपसंघटना ‘सुफा’ या संघटनेशी संबंध असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राष्ट्रीय तपास यंत्रणेने इतर चार आरोपींवर प्रत्येकी तीन लाख रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केली आहे.
मोहम्मद शहनवाज, शफी जुम्मा आलम अब्दुल्ला, रिजवान अब्दुल हाजी अली, अब्दुल्ला फैयाज शेख डायपरवाला आणि ताला लिवाकत खान अशी या आरोपींची नावे आहेत. एनआयएकडून या चार जणांवर बक्षीस ठेवण्यात आले असून दहशतवादी संघटनेचा प्रचार आणि प्रसार केल्याप्रकरणी या आरोपींचा वॉन्टेड यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. आरोपींना पकडून देणाऱ्यांना बक्षिस दिले जाणार असून माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असेही एनआयएकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान एनआयएकडून या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे. आत्तापर्यंत याप्रकरणात सात आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. तर पुणे इसीस मोड्युल प्रकरणातील चार वाँटेड आरोपींवर एनआयएकडून बक्षिस जाहीर करण्यात आल्याने त्यांच्या शोधासाठी विविध तपास यंत्रणा समोर येणार आहेत.








