कोल्हापूर :
स्त्रीभ्रुण हत्या तथा गर्भलिंग तपासणी प्रकरण राज्य सरकारने गांभिर्याने घेतले आहे. यासंदर्भात आता कडक पावले उचलली जाणार आहेत. गर्भलिंग निदान करणाऱ्यांची माहिती देणाऱ्या व्यक्तीस आता 1 लाख रुपये बक्षीस राज्य सरकारकडून दिले जाणार आहे. तर या प्रकरणात धाडसाने समोर येणाऱ्या पिढीत महिलेला देखील 1 लाख रुपये दिले जाणार असल्याची घोषणा आरोग्य मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली. पीसीपीएनडीटी हा कायदा प्रभावीपणे राबवणार आहे. येत्या काही दिवसात याबाबतचा अध्यादेश जारी करणार असल्याची त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते. मंत्री आबिटकर पुढे म्हणाले, मुलींचे प्रमाण चिंताजनक आहे. गर्भलिंग निदान विरोधात राज्यातील सर्वच पोलीस प्रशासनाला आणि आरोग्य व्यवस्थेला सूचना दिल्या आहेत. पुढच्या पंधरा दिवसात त्याबाबत कारवाही दिसेल. या कायद्याला अधिक प्रभावी करणे गरजेचे आहे. नुकतीच राज्य शासनाच्या आरोग्य विभागाची एक बैठक झाली आहे. ज्या सामाजिक संस्था यांना या प्रक्रियेत सामावून घेणे, पोलीस आणि आरोग्य विभाग आणि महसूल विभागाचे अधिकाऱ्यांनी चांगले काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे राज्यभरातील सर्व सामाजिक संस्था या प्रकरणात कार्यान्वित होतील. भरारी पथकाकडून अशा लोकांवर कडक कारवाई होईल.
शासकीय यंत्रणेतील लोक दबाव टाकत असतील तर चौकशी करून त्यांच्यावर ही कारवाई केली जाईल, असा इशारा आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिला.
जिह्यातील विविध विकास कामासंदर्भात आज लोकप्रतिनिधी सोबत अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. 31 मार्चपर्यंत उर्वरित निधी खर्च करण्याबाबतची चर्चा या बैठकीत झाली. येणाऱ्या सात तारखेच्या बैठकीत जिह्यासाठी निधी आणण्याची मागणी करणार असल्याची पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी माहिती दिली.

- पालकमंत्री अॅक्शन मोडवर
गर्भलिंग तपासणीसह अन्यही विषयासंदर्भात पालकमंत्री आबिटकर यांनी बैठकीत आढावा घेतला. या बैठकीत ते अॅक्शन मोडवर असल्याचे दिसून आले. ते म्हणाले, शाहुवाडी तालुक्यातील झालेल्या बेकायदेशीर वृक्ष तोड संदर्भात कायदेशीर गोष्टीच समर्थन करणार नाही. पालकमंत्री म्हणून कुठेही बेकायदेशीर चुकीच्या गोष्टी चालणार नाहीत. जे योग्य आणि कायदेशीर असेल तर अतिशय चांगल्या पद्धतीने ती कामे केली जातील. जे बेकायदेशीर आहे. त्यावर कडक कारवाई केली जाईल, इतर प्रकरणाच्या चौकशीचे आदेश लवकरच दिले जातील. असा इशारा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिला. गड किल्ल्यांवरील अतिक्रमण काढणे ही सरकारची जबाबदारी आहे. या सर्व कामाला आता गती येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
- जिल्हाधिकारी कार्यालयात पहिलीच बैठक
मंत्री प्रकाश आबिटकर यांची पालकमंत्रीपदी निवड झाल्यानंतर शुक्रवारी प्रथमच ते जिल्हाधिकारी कार्यालयात आले. त्यांनी विविध विषयावर चर्चा केली. यामध्ये गर्भलिंग विषयी ते आक्रमक भूमिकेत दिसून आले.








