वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीच्या महिलांच्या वनडे फलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत भारताची धडाकेबाज फलंदाज स्मृती मानधना हिचे स्थान दोन अंकांनी वधारले आहे. या ताज्या मानांकन यादीत मानधना सध्या चौथ्या स्थानावर आहे.
या मानांकन यादीत 27 वर्षीय मानधना यापूर्वी सहाव्या स्थानावर होती. आता तिने दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वुलव्हर्टला मागे टाकले आहे. वुलव्हर्ट सध्या या मानांकन यादीत पाचव्या स्थानावर आहे. या यादीमध्ये इंग्लंडची नॅट स्किव्हेर ब्रंट पहिल्या स्थानावर, लंकेची चमारी अटापट्टु दुसऱ्या तर ऑस्ट्रेलियाची बेथ मुनी तिसऱ्या स्थानावर आहे.
वनडे महिलांच्या गोलंदाजांच्या मानांकन यादीत इंग्लंडची सोफी इक्लेस्टोन पहिल्या स्थानावर असून दक्षिण आफ्रिकेची कॅप दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीत भारताची दिप्ती शर्मा चौथ्या स्थानावर आहे.









