कौन्सिल विभागाकडून तत्परता : 63 जण पात्र
बेळगाव : महानगरपालिकेच्या चारही स्थायी समित्यांसाठी बुधवार दि. 2 रोजी निवडणूक होणार आहे. निवडणुकीसाठीची सर्व तयारी कौन्सिल विभागाकडून पूर्ण करण्यात आली असून सोमवारी दुपारी महापौर मंगेश पवार, नगरसेवक जयंत जाधव या दोघांना वगळता 63 जणांची सुधारित यादी प्रादेशिक आयुक्त कार्यालयाला पाठविण्यात आली. स्थायी समितीची निवडणूक घेण्यात यावी, असा प्रस्ताव महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी प्रादेशिक आयुक्त कार्यालयाकडे पाठविला होता. त्याचबरोबर मतदानासाठी पात्र असलेल्या मतदारांची नावे व यादीही पाठविण्यात आली होती. यापूर्वी पाठविण्यात आलेल्या मतदार यादीमध्ये 58 लोकनियुक्त नगरसेवक आणि 7 पदसिद्ध सदस्य अशी एकूण 65 जणांची मतदार यादी कौन्सिल विभागाकडून प्रादेशिक आयुक्त कार्यालयाला पाठविण्यात आली होती.
मात्र, गुरुवारी रात्री महापौर मंगेश पवार आणि नगरसेवक जयंत जाधव हे अपात्र ठरल्याचा आदेश जारी झाल्यानंतर कौन्सिल विभागाकडून पुन्हा सुधारित मतदार यादी तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले. स्थायी समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, तसेच कानडीकरणाच्या अंमलबजावणीसाठी कौन्सिल विभागातील अधिकारी-कर्मचारी शनिवारी व रविवारीदेखील महापालिकेत हजर होते. सोमवारी मतदार यादीतून मंगेश पवार आणि जयंत जाधव यांची नावे वगळून सुधारित 63 जणांची मतदार यादी प्रादेशिक आयुक्त कार्यालयाला पाठविण्यात आली. एखाद्या वेळेस दोघांना न्यायालयात स्थगिती मिळाल्यास पुन्हा सुधारित यादी तयार करून 65 जणांची मतदार यादी पाठवावी लागणार आहे. त्यामुळे कौन्सिल विभागाची डोकेदुखी वाढली आहे. न्यायालयाचा आदेश काहीही येऊ तोपर्यंत सध्याच्या आदेशानुसार 63 जणांची मतदार यादी प्रादेशिक आयुक्त कार्यालयाला पाठविण्यात आल्याचे कौन्सिल विभागाकडून सांगण्यात आले.









