मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती : दोघांच्याही प्रगतीवर लक्ष ठेवणार विद्या समीक्षा केंद्र,शिक्षकांना ‘मुख्यमंत्री वशिष्ठ गुरू’ पुरस्कार प्रदान
पणजी : राज्यभरातील विद्यार्थ्यांची शिक्षणातील प्रगती, त्यांना देण्यात येणारे शैक्षणिक ज्ञान व त्यांना शिक्षणात येणाऱ्या अडचणी व शिक्षकांनी शिकवलेले विद्यार्थ्यांना कितपत कळले या सर्वांची माहिती तसेच शिक्षणातील विद्यार्थी व शिक्षकांचे दर महिन्याचे रिपोर्ट कार्ड तयार करण्याच्या उद्दिष्ठाने विद्या समीक्षा केंद्र लवकरच सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. शिक्षक दिनाचे औचित्य साधून दोनापावला येथील राजभनातील दरबार सभागृहात काल मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या शिक्षकांच्या सन्मान कार्यक्रमात मुख्यमंत्री सावंत बोलत होते. यावेळी मंचावर शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे, सचिव प्रसाद लोलयेकर, शंभू घाडी व पुरस्कार प्राप्त आठ शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमात या आठही शिक्षकांना ‘मुख्यमंत्री वशिष्ठ गुरू’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
लवकरच विद्या समीक्षा केंद्र
सरकारने शिक्षण क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्णता यावी, यासाठी विशेष कार्य केलेले आहे. शिक्षण खात्याने अनेकांशी विविध सामंजस्य करार केले आहेत. शिक्षणाचा दर्जा सुधारण्याबरोबरच एकही विद्यार्थी शिक्षणात पाठिमागे राहू नये, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून विद्या समीक्षा केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या केंद्रामार्फत शिक्षकाला एखादा विद्यार्थी शिक्षणात मागे पडत असेल तर त्याचे कारण शोधण्यास मदत होणार असल्याचेही ते म्हणाले. विद्यार्थी व शिक्षकांचे मॉनिटरिंग करण्याचे काम विद्या समीक्षा केंद्रामार्फत होणार आहे. शिक्षक शिकवत असलेला विषय विद्यार्थी कसा आत्मसात करतात हे समजणार आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व शिक्षकांच्या कामगिरीचा अहवालही या केंद्रामार्फत तयार केला जाणार असून, दर महिन्याला शिक्षकांना त्यांचे रिपोर्ट कार्ड देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
गोव्यात काम करणाऱ्यांना भरपूर संधी
शिक्षण धोरणाची अमलबजावणी करण्याविषयी सरकार ठाम आहे. गोव्यात बेकारी असल्याचा आरोप अनेकदा विरोधकांकडून केला जातो. परंतु गोव्यात बेकारी नाहीच. कारण येथे काम करणाऱ्यांना भरपूर काम आहे. परंतु त्याचा फायदा युवक व बेकार लोक घेत नसल्याचे दिसून येते. जर गोव्यातील युवकांनी प्रत्येक क्षेत्रात हिरीरीने सहभाग दाखवल्यास गोव्याबाहेरील लोकांना येथे येण्याची गरजच नाही. शिक्षणातही गोव्यात चांगल्या मुलभूत सुविधा असल्याने त्याचा विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
आठ शिक्षकांना ‘मुख्यमंत्री वशिष्ठ गुरू’ पुरस्कार प्रदान
मुख्याध्यापिका नीता साळुंखे (एल. डी. सामंत मेमोरियल माध्यमिक विद्यालय, पर्वरी), आंतोनेत डिसोझा (आवर लेडी ऑफ रोझरी माध्यमिक विद्यालय, दोनापावला), मुख्याध्यापिका सुचित्रा देसाई (पॉप्युलर माध्यमिक विद्यालय, कोंब मडगाव), हर्षिता नाईक (सरकारी प्राथमिक शाळा, चोनसाई-पार्से), सोनिया माणगावकर (ए. व्ही. लॉरेन्स सरकारी प्राथमिक शाळा, मडगाव), उमेशा सावळ (सरकारी माध्यमिक विद्यालय, केपे-फातर्पा), दत्ता परब (श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालय, पीर्ण-बार्देश), तर सर्वण-डिचोली येथील केशव सेवा साधनातर्फे विशेष विद्यार्थ्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या नारायण झांट्यो माध्यमिक विद्यालयाचे शारीरिक शिक्षक प्रेमानंद नाईक यांना ‘मुख्यमंत्री वशिष्ठ गुरू’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सरकारी शाळांत दोन शिक्षक नेमणार
राज्यातील सरकारी शाळांच्याबाबतीतही सरकार गंभीर आहे. सरकारी प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची संख्या वाढवली जात असून, ज्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे, त्या ठिकाणी लवकरच शिक्षक नेमण्यात येणार आहेत. विशेषत: एक शिक्षक असलेल्या प्राथमिक शाळांमध्ये किमान दोन शिक्षक असतील, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. राज्यातील अनेक विद्यार्थी दहावी, बारावी किंवा पदवी शिक्षण घेऊन नोकरीविना वंचित आहेत. परंतु अशा विद्यार्थ्यांनी नोकरीची वाट न पाहता मुख्यमंत्री अप्रेंटीशीप योजनेचा लाभ घ्यावा. यातून त्यांना पुढे नोकऱ्यांच्या अनेक संधी उपलब्ध होतील, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.









