जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट
बेळगाव : जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी गुरुवारी कित्तूर तालुक्यातील विविध ग्राम पंचायतींना भेट देऊन जलजीवन मिशन योजनेच्या कामांचा आढावा घेतला. दास्तीकोप्प ग्राम पंचायतीच्या डिजिटल लायब्ररीला भेट देऊन आढावा घेतला. त्यानंतर देवरशिगीहळ्ळी ग्राम पंचायत अंतर्गत मार्गनकोप्प गाव व निच्चणकी ग्राम पंचायत अंतर्गत तेगूर, डोंबरकोप्प व देगाव या गावांना भेट देऊन जलजीवन मिशन योजनेंतर्गत सुरू असलेल्या नळजोडणी ठिकाणांची पाहणी केली. स्थानिक नागरिकांच्या घरामध्ये बसविण्यात आलेल्या नळजोडणीबाबत स्थानिकांशी व ग्रा. पं. अध्यक्ष, सदस्य़ांशी चर्चा केली.
गावातील पिण्याच्या पाणी स्रोतांच्या व पाणी टाक्यांच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. जलजीवन मिशन योजनेंतर्गत प्रलंबित कामे लवकर पूर्ण करण्यासाठी व जनतेला जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करण्याकडे लक्ष द्यावे, अशी अधिकाऱ्यांना सूचना केली. डोंबरकोप्प येथील अंगणवाडी केंद्राला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (एनआरएलएम) योजनेच्या प्रगतीचा आढावा ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांसोबत घेतला. महिलांना कोंबड्यांसाठी शेड बांधण्याची गरज असून या कामासाठी जागा निश्चित करण्यास ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना सूचना केली. यावेळी ग्रामीण पेयजल-स्वच्छता विभागाचे कार्यकारी अभियंता किरण घोरपडे, कार्यकारी अधिकारी महेश हुल्ली, साहाय्यक संचालक महम्मदगौस रिसालदार, ग्रा. पं. अध्यक्ष, सदस्य, पीडीओ व अन्य कर्मचारी उपस्थित होते.









