आतापर्यंत 1102 मालमत्तांची नोंदणी : शहर-उपनगरात 1 लाख 40 हजारांहून अधिक मालमत्ता
प्रतिनिधी / बेळगाव
शहरातील मालमत्तांची नोंद केएमएफ-24 यावर नोंद करण्याचा आदेश नगरविकास खात्याने बजावला आहे. याबाबतची माहिती घेण्यासाठी गुरुवारी महापालिका कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. आतापर्यंत केवळ 1102 मालमत्तांची नोंद या प्रणालीवर झाल्याने याबाबत नगरविकास खात्याच्या अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. हे काम युद्धपातळीवर करण्याची सूचना मनपाच्या महसूल विभागाला केली.
नगरविकास खात्याच्या सहसंचालिका प्रीती गेहलोत व शिवकुमार यांनी गुरुवारी दुपारी महापालिका कार्यालयाला भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली. यावेळी त्यांनी विशेषत: केएमएफ-24 च्या कामकाजाचा आढावा घेतला. केएमएफअंतर्गत प्रत्येक मालमत्तांची माहिती आणि मोजमाप नोंद करण्याची सूचना सहा महिन्यांपूर्वी करण्यात आली होती. पण हे कामकाज सुरू झाले नव्हते. गेल्या चार दिवसांपासून केएमएफ-24 अंतर्गत मालमत्तांची नोंदणी करण्यात येत आहे. त्यामुळे आतापर्यंत 1102 मालमत्तांची नोंदणी झाली असल्याचे बैठकीवेळी सांगण्यात आले.
सदर कामकाज संथगतीने सुरू असल्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच हे काम युद्धपातळीवर करण्याची सूचना केली. शहर व उपनगरात 1 लाख 40 हजारांहून अधिक मालमत्ता असल्याने सर्व मालमत्तांची नोंद केएमएफअंतर्गत होणे आवश्यक आहे. तसेच यावेळी व्यवसाय परवान्याबाबतची माहिती घेण्यात आली. व्यवसाय परवानादेखील ऑनलाईनद्वारे देण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे व्यावसायिकांना ऑनलाईन अर्ज करण्याची सूचना करून सर्व व्यावसायिकांना व्यवसाय परवाना बंधनकारक करणे आवश्यक आहे, असे सांगितले.
मीटरप्रमाणे बिल आकारणार
पाणीपुरवठा योजनेंतर्गत नळधारकांना बिल दिले जाते. मात्र नागरिकांना कोणत्या आधारावर बिल दिले जाते? असा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसण्याची शक्यता आहे. जितका पाण्याचा वापर होईल, तितकेच बिल आकारण्याची पद्धत सुरू केल्यास नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसणार नाही. त्यामुळे प्रथम प्रत्येक नळाला मीटरसक्ती करण्याची सूचना एलअॅण्डटी कंपनीच्या अधिकाऱ्यांना केली. 24 तास पाणीपुरवठा योजनेंतर्गत मीटरप्रमाणे बिल आकारणी केली जाणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी सांगितली. पण ज्या ठिकाणी मीटर बसविण्यात आले नाही, त्या भागात मीटरसक्ती करावी, अशा विविध सूचना प्रीती गेहलोत यांनी मनपा अधिकाऱ्यांना तसेच एलअॅण्डटीच्या कंपनी अधिकाऱ्यांना केल्या.









