वेळेत कामे पूर्ण करून घेणार : आमदार उल्हास तुयेकर, पंच-अधिकाऱ्यांशी चर्चा
प्रतिनिधी / मडगाव
नावेली मतदारसंघातील मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेताना यापुढे दैनंदिन सुरू असलेल्या कामांवर लक्ष ठेवून ती वेळेत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर यांनी दिली. नावेली पंचायतीच्या सभागृहात बुधवारी नावेली मतदारसंघातील सर्व पंचायतींच्या पंचांशी विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली. यावेळी आवश्यक सूचना करण्यात आल्या.
मतदारसंघातील मुख्य रस्त्यानजीकची गटारे, नाले तसेच अंतर्गत रस्त्यांनजीकची गटारे उपसण्यात येत असल्याचे तुयेकर यांनी नजरेस आणून दिले. नागमोडे येथे मागील वेळी पाणी साचून पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. ती पुन्हा उद्भवू नये यासाठी संबधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहे. नाल्यांतून कचरा व अन्य साहित्य वाहून येऊन येथील पुलानजीक साठून पाणी साचून राहण्याचे प्रकार रावणफोंड व नजीकच्या भागात होत असल्याने येथील नाल्यांची साफसफाई करण्यात आलेली आहे. वीज खात्याला तसेच अग्निशामक दलाला आवश्यक ठिकाणच्या धोकादायक स्थितीतील झाडांच्या फांद्या छाटण्यास सांगितलेले आहे, असे आमदार तुयेकर यांनी सांगितले. नावेली मतदारसंघातील कचरा समस्येत अधिक सुधारणा होणे आवश्यक आहे हे मी मान्य करतो. रुमडामळ तसेच नावेली पंचायतींकडून चांगले काम होत आहे. रुमडामळ पंचायतीने कचरा प्रक्रियेसाठी यंत्रणा व गाडीही घेतलेली आहे. आकें बायश पंचायतीने कचरा शेड उभारली आहे. लवकरच गाडी आणि यंत्रणा घेतली जाणार आहे, दवर्ली पंचायतीला कचरा व्यवस्थापनावर अधिक भर द्यावा लागणार आहे. नावेली कचरामुक्त होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे तुयेकर यांनी सांगितले.








