जि. पं. चे हर्षल भोयर यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
बेळगाव : पावसाने दडी मारल्याने मलप्रभा नदीपात्र कोरडे होत चालले आहे. पूर्णपणे पाणी आटण्याआधी खबरदारी घेण्यात यावी. या परिसरातील सर्व खेड्यांना त्या त्या ग्राम पंचायतीच्यावतीने पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी व्यवस्था करण्याची सूचना जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर यांनी अधिकाऱ्यांना केली आहे. रविवारी एम. के. हुबळीजवळील मलप्रभा नदीपात्रावर असलेल्या बहुग्राम पिण्याच्या पाणी योजनेच्या प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केल्यानंतर त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना वरील सूचना दिली आहे. पावसाला विलंब झाला आहे. त्यामुळे साहजिकच नदीपात्र कोरडे पडत आहे. लवकर पाऊस पडला नाही तर समस्येत भर पडणार आहे. कित्तूर व त्या परिसरातील 13 खेडी, हुलीकट्टी व परिसरातील 6 खेड्यांमध्ये पाणी परिस्थिती हाताळण्यासाठी त्वरित उपाययोजना राबविण्याची सूचनाही त्यांनी केली आहे. मलप्रभा नदीतून पुढील पंधरा दिवस पाणीपुरवठा करता येईल इतके पाणी आहे. जर पंधरा दिवसात पाऊस पडला नाही तर समस्या गंभीर होणार आहे. म्हणून रविवारी त्यांनी बहुग्राम पाणीपुरवठा प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. कत्रीदो•ाr व कुलवळ्ळी या गावांना भेटी देऊन तेथील पाणीसमस्येची पाहणी केली. नागरिकांशी चर्चा करून कूपनलिकांवरील नादुरुस्त मोटारी त्वरित दुरुस्त करून पाणीपुरवठा करण्यात यावा, असे सांगतानाच पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्यास स्थानिक अधिकाऱ्यांनाच जबाबदार धरण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी कित्तूर तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी सुभाष संपगावी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंते शशिकांत नायक, साहाय्यक कार्यकारी अभियंते प्रवीण मठपती, एस. एम. पाटील, ग्रा. पं. अध्यक्ष बिष्टाप्पा शिंदे, पीडीओ राधा यांच्यासह वेगवेगळ्या ग्राम पंचायतीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.









