पोलीस मुख्यालयात झाली बैठक
बेळगाव : जिल्ह्यातील विविध पोलीस स्थानकात दाखल झालेल्या गुन्हेगारी प्रकरणांचा तपासाचा आढावा घेण्यात आला. बुधवारी पोलीस मुख्यालयात जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पोलीस अधिकाऱ्यांना गुन्हेगारी प्रकरणांच्या तपासासंबंधी सूचना करण्यात आली. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित ठेवण्याबरोबरच गुन्हेगारी प्रकरणांचा तपासही विनाविलंब करावा, अशी सूचना जिल्हा पोलीसप्रमुखांनी केली. अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख आर. बी. बसरगी यांच्यासह गोकाक, बैलहोंगल, रामदुर्ग, चिकोडी, अथणीचे पालीस उपअधीक्षक व पोलीस निरीक्षक या बैठकीला उपस्थित होते. प्रत्येक महिन्यात जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कायदा व सुव्यवस्था परिस्थिती व गुन्हेगारी प्रकरणांच्या तपासाचा आढावा घेण्यात येतो. याच बैठकीत प्रशासकीय विषय चर्चेला येतात. पोलीस स्थानक निहाय गुन्हेगारी प्रकरणांच्या तपासाचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या जातात.









