वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अमरनाथ यात्रा सज्जतेचा आढावा केंद्रीय गृहविभागाकडून घेण्यात आला आहे. यासाठी येथे शुक्रवारी महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बेठकीत जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उपस्थित होते. त्याचप्रमाणे केंद्रीय आणि जम्मू-काश्मीरच्या गृह विभागाचे अनेक अधिकारीही उपस्थित होते. यात्रेकरुंसाठीची सुरक्षा व्यवस्था, पाणीपुरवठा, आरोग्य आणि वैद्यकीय सेवासुविधा आदींसंबंधी शहा यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. तसेच त्यांना महत्वाच्या सूचनाही केल्या. यंदा या यात्रेला भाविकांचा विक्रमी प्रतिसाद मिळण्याची शक्यता असल्याने केंद्र सरकारने यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वंकष योजना सज्ज केली आहे.









