बेळगाव : मनपा आयुक्त शुभा बी. यांनी सोमवार दि. 27 रोजी सकाळपासून सायंकाळपर्यंत महापालिकेतील विविध विभागांच्या मॅरेथॉन आढावा बैठका घेतल्या. त्यामुळे दिवसभर महापालिकेत महसूल, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, त्याचबरोबर इतर विभागांच्या अधिकाऱ्यांची वर्दळ होती. शहरातील निवासी आणि व्यापारी आस्थापनांकडून घरपट्टी वसुलीत कोणत्याही प्रकारे दुर्लक्ष करण्यात येऊ नये, थकीत घरपट्टी वसुलीसाठी विशेष प्रयत्न करावेत, महापालिकेच्या महसुलात वाढ व्हावी यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी संगनमताने काम करावे, अशा प्रकारच्या महत्त्वाच्या सूचना यावेळी मनपा आयुक्त शुभा बी. यांनी बैठकीत केल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना शहरातील रेंगाळलेली विकासकामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत, अशी सूचना केली. तसेच नवीन आराखडे तयार करण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
विविध विभागांच्या बैठका पार पडल्यानंतर सायंकाळी आरोग्य विभागाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे, साहाय्यक कार्यकारी अभियंता पर्यावरण हणमंत कलादगी यांच्यासह आरोग्य निरीक्षक उपस्थित होते. कचऱ्याचे वर्गीकरण केले जात असले तरी केवळ 70 टक्के उद्दिष्ट गाठण्यात आले आहे. त्यामुळे ओला आणि सुक्या कचऱ्याचे पूर्णपणे वर्गीकरण व्हावे यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर नूतन व्यापार परवाना आणि व्यापार परवान्यांचे नूतनीकरण करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांनी कटाक्षाने काम करावे. परवानांच्या माध्यमातून महापालिकेला आतापर्यंत किती महसूल जमा झाला आदी प्रकारची माहिती यावेळी घेण्यात आली. बैठकीला उपस्थित आरोग्य निरीक्षकांनी प्रभागनिहाय व्यापार परवान्यांची माहिती आयुक्तांना दिली.









