कोट्यावधींच्या कामांचा रेंगाळलेपणा
पुसेगाव / प्रतिनिधी
श्री सेवागिरी महाराजांच्या आर्शिवादाने पुसेवाडीचे पुसेगाव शहर झाले. शासनासह लाखो भाविकांच्या हजारो हातांनी दान दिले जाते. परंतु पुसेगावकरांची फाटकी झोळीच त्याला कारणीभूत असल्याने गावच्या विकासाची गंगा उलटी वाहत असल्याची चर्चा ग्रामस्थांमधून होत आहे. त्यामुळे हा सर्व प्रकार कोणामुळे? कशामुळे? यांच्यामुळे की त्यांच्यामुळे या प्रश्नांची उत्तरे अनुत्तरीतच आहेत. राज्यकर्त्यांच्या पैशावर-पैसा ढीग लावून मतांची बेरीज करणारी पिढी पुढे येत राहिली आणि मतांची दलाली करुन स्वतःची पोटे भरणारी प्रवृत्ती अशीच वागत राहिली तर गावाची वाट लागल्या शिवाय राहणार नाही. अशी प्रतिक्रिया आता जुनी-जानती मंडळी देऊ लागली आहेत.
एका बाजूला महाराजांच्या अध्यात्मिक विचारधारेवर समाज प्रगल्भ होत असताना दुसऱ्या बाजुला दिशाहीन युवा पिढी, बोकाळलेला चंगळवाद, वाळुचोर, मटकाकिंग, दारुचोर आणि भंगार फाळकुटदादा आपले साम्राज्य विस्तारताना दिसत आहेत. गावावर सामाजिक व सांस्कृतिक धाक राहिला नाही तर कोणत्याही गावाची परवड झाल्याशिवाय राहत नाही. पुसेगावच्या विकासासाठी यापुर्वी जुन्या राजकारण्यांनी प्रामाणिक प्रयत्न करीत गावाला एक अभ्यासू तसेच निस्वार्थी राजकीय गाव अशी ओळख निर्माण करुन दिली. नवीन राजकर्त्यांनी देखील नव्या उमेदीने काम करण्याचा प्रयत्न चालविला आहे. परंतु अंतर्गत गट-तट, अल्पावधीत मुजोरी महत्वकांक्षा, नेतृत्वगुणांचा काहीसा अभाव आणि स्वार्थी-मतलबी राजकारण यामुळे गावविकासाला खिळ बसत असल्याचे चित्र दिसत आहे.
विकासाचे गाडे रुतलेलेच आहे. शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचा 11 कोटी 77 लाख निधी अद्यापि तसाच आहे. सातारा-पंढरपुर मार्गावरील पुसेगाव हद्दीतील अंतर्गत काँक्रीटीकरण व आरसीसी दुदर्फा गटार योजना रखडलेली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून पुसेगाव -वडूज रस्त्याच्या दुतर्फा गटार योजना मंजूर झाली. सातारा जिह्याचे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या परिश्रमातून 1 कोटी 65 लाख रुपयांचा निधी यासाठी मंजूर झाला. परंतु, छत्रपती शिवाजी चौक ते एस्सार पेट्रोलपंप असे काम होणे अपेक्षित असताना कॉन्ट्रॅक्टर महाशयांनी वडूजकडून उलटे काम सुरु करुन बरोबर हॉटेल साईशच्या दारात आणून बंद केले. कोणाच्या राजकीय सडक्या डोक्याच्या सांगण्यावरुन हे काम केले हे सांगायला कॉन्ट्रक्टर घाबरत आहे. कोणामुळे ही प्रवृत्ती आली हे माहित नाही. याशिवाय गावोगांवच्या छोटय़ा-मोठय़ा नियमानुसार चाललेल्या कामात लक्ष घालायला आमदारांकडे वेळ नाही मात्र त्यांच्या नावावर पुसेगावातही दुकानदारी चालविणारी कोण महाभाग आहेत ? हे कळायला ग्रामस्थांना वेळ लागणार नाही.
सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ग्रामपंचायत कारभार ढिंम्मच आहे. पुसेगावमधील अतिक्रमणे काढण्यासाठी पिडब्लूडी विभागातील कर्मचारी मोठय़ा इर्षेने संबंधित खोके धारकांना कारवाईची पत्रे देतात. मात्र पत्रे देतानाच दुसऱ्या हातांनी ‘पतपुरवठा’ घेतल्यासारखे मुग गिळून गप्प बसत असल्याची चर्चा लोकांमधून होत आहे. या विभागाने अगदी अंग मोडून एखादे काम केले असे ऐकिवात नाही. याचबरोबर ग्रामपंचायतीची अवस्था देखील काही वेगळी नाही. ग्रामपंचायत वेळोवेळी खोकेधारकांना नोटीस बजावते परंतु ती फक्त तुझ्या-माझ्या पर्यंतच कारवाई असते.
शेतीपंपाच्या विजेचा प्रश्न
पुसेगाव परिसरात सध्या शेती विजेचा प्रश्न गंभीर आहे. ऐन वाढीच्यावेळी पिकांना पाणी वेळेत मिळणे आवश्यक असताना वीज वितरण कंपनीचे कर्मचारी थातूर-मातूर कारणे देऊन शेतकऱयांना फसवित आहेत. आपल्या विभागात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याचे सांगूनवेळ मारुन नेण्यापलिकडे हा विभाग काही काम करत नसल्याचे लोक सांगतात.
विकासाचे राजकारण होणे गरजेचे
पुसेगावचे महत्व केवळ यात्रा काळाचे दहा दिवसाचे नसून उर्वरित काळातही येथील विकासकामे होणे आवश्यक आहे. बकाल स्वरुप प्राप्त होत असलेल्या या गावामध्ये पाणी नियोजन, रस्ता प्रश्न, सांडपाणी व्यवस्था, विज वितरण, ग्रामस्वच्छता, महसूल विषयी कामे, महिला सबलिकरण, आरोग्य व्यवस्था, शैक्षणिक सुविधा इ. बाबत गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. यासाठी राजकीय हेवेदाबे बाजूला ठेऊन सर्वांनी पुढे येणे काळाची गरज आहे. तेव्हाच पुसेगावच्या विकासाची गंगा सुलट व निर्मळपणाने वाहती राहिल हे नक्की.









