कोल्हापूर :
राज्य सरकारच्या उत्पन्नाच्या मुख्य स्त्रोत असणाऱ्या विभागापैकी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग हा एक आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून नऊ महिन्यांत या विभागाने 347 कोटी 75 लाख इतका महसुल जमा केला आहे. 55 हजार 430 दस्त नोंदणीतून ही रक्कम जमा झाली आहे. टार्गेटच्या तुलनेत ही रक्कम कमी आहे. उर्वरित तीन महिन्यांत या विभागाला तब्बल 296 कोटींचा महसूल जमा होणे आवश्यक आहे. महिन्याला किमान 100 कोटींचा मुद्रांक शुल्क जमा होणे अपेक्षित आहे.
राज्य सरकारला मुद्रांक शुल्क विभागाने तब्बल 40 हजार 196 कोटी रुपयांचा महसूल गोळा करून दिला आहे. राज्य सरकारने नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला 54 हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले असून पुढील तीन महिन्यांत विभागाला आणखी 15 हजार कोटी रुपये महसूल आणून देणे अपेक्षित आहे. राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने गेल्या आर्थिक वर्षात 50 हजार कोटी रुपयांचा महसूल राज्य सरकारच्या तिजोरीत जमा केला होता. गेल्या वर्षी राज्यभरात 27 लाख 90 हजार 121 दस्तांच्या नोंदणीतून हा महसूल जमा झाला होता.
कोल्हापूर जिल्ह्यातून मात्र, अपेक्षित मुद्रांक शुल्क जमा होताना दिसून येत नाही. कोल्हापूर विभागाला तब्बल 640 कोटींचे वसुलीचे टार्गेट आहे. एप्रिल 2024 ते डिसेंबर 2024 पर्यंत 347 कोटी 75 लाख इतका मुद्रांक शुल्क जमा झाला आहे. 54 टक्के टार्गेट पूर्ण झाले असून पुढील तीन महिन्यांत उर्वरित 296 कोटींचा मुद्रांक शुल्क वसुल होण्याचे आव्हान आहे.
मुद्रांक शुल्कचे मिळणारे उत्पन्न
रजिस्ट्रेशन, हुकमनामे, विनानोंद करारपत्र, स्टॅम्प ड्युटी, दुकान गाळे भाडेपट्टी
अभय योजनेमुळे 8 कोटींचा मुद्रांक शुल्क वसूल
मुद्रांक शुल्क वसुलीसाठी राज्य शानाने अभय योजना आणली होती. यामध्ये 10 टक्के सवलत देण्यात आली. यामुळे डिसेंबर 2022 ते सप्टेंबर 2023 पर्यंत 8 कोटी 57 लाख 9 हजार 624 इतका मुद्रांक शुल्क वसुल झाला आहे. यामध्ये 4 कोटी 83 लाख 76 हजार 501 इतका मुद्रांक शुल्क तर 3 कोटी 50 लाख 92 हजार 684 इतका दंड वसुल झाला आहे.
गतवर्षीच्या तुलनेत कमी मुद्रांक शुल्क जमा
गतवर्षी राज्यशासनाने कोल्हापूर विभागाला 525 कोटींचे टार्गेट दिले होते. यावेळी 532 कोटी महसुल जमा झाला. 100 टक्क्याहून अधिक वसुली झाल्याने कोल्हापूर विभागाचा नोंदणी महानिरिक्षकांच्या हस्ते सत्कार झाला. यंदा 640 कोटींचे टार्गेट दिले असून 347 कोटींचा मुद्रांक शुल्क जमा झाला आहे.
महिना जमा मुद्रांक शुल्क
एप्रिल 2024 29 कोटी 86 लाख 5 हजार
मे 39 कोटी 30 लाख 16 हजार
जुन 45 कोटी 40 लाख 74 हजार
जुले 40 कोटी 27 लाख 59 हजार
ऑगस्ट 41 कोटी 4 लाख 96 हजार
सप्टेंबर 31 कोटी 23 लाख 78 हजार
ऑक्टोंबर 45 कोटी 8 लाख 32 हजार
नोव्हेंबर 30 कोटी 6 लाख 2 हजार
चार वर्षातील मुद्रांक शुल्क वसुली स्थिती
आर्थिक वर्ष उद्दिष्टे नोंदणी झालेले दस्त वसुली
2021-22 329 कोटी 68878 330 कोटी 26 लाख
2022-23 350 कोटी 86795 456 कोटी 20 लाख
2023-24 525 कोटी 96639 532 कोटी 56 लाख
2024-25 640 कोटी 55430 347 कोटी 75 लाख








