मनपा आयुक्त उपलब्ध नसल्याने फिरावे लागले माघारी
बेळगाव : महापालिकेच्या महसूल विभागात सेवा बजावणाऱ्या एका महसूल निरीक्षकाने तडकाफडकी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. राजीनामा देण्यासाठी महसूल निरीक्षक मंगळवारी मनपा आयुक्तांच्या कक्षाकडे गेले होते. मात्र दिवसभर आयुक्त कार्यालयाकडे आल्या नाहीत. त्यामुळे राजीनामा न देताच महसूल निरीक्षकाला माघारी फिरावे लागले. पण या प्रकाराची महापालिका वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काही नगरसेवक व अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून त्या महसूल निरीक्षकाने राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. ई-आस्थीअंतर्गत मिळकतींची नोंदणी करून घेऊन मिळकतधारकांना ए व बी खात्यांचे वितरण केले जात आहे. मात्र मिळकतींची नोंदणी व इतर दैनंदिन कामांचा ताण विशेषकरून महसूल निरीक्षकांवर वाढला आहे.
पण काही नगरसेवक आपली कामे तातडीने करून देण्यात यावीत यासाठी अधिकारीवर्गावर दबावतंत्र वापरत असल्याची चर्चा आहे. सुटीदिवशी, तसेच रात्री-अपरात्रीदेखील काही नगरसेवक महसूल निरीक्षकांना फोन करून सतावत आहेत. यापूर्वी महसूल अधिकारी व नगरसेवकांमध्येही वादावादीचे प्रसंग घडले आहेत. या प्रकाराची सर्वसामान्य बैठकीतदेखील चर्चा झाली. अधिकाऱ्यांवर दबाव घालण्यासह धमकी दिली जात असल्याने काही दिवसांपूर्वी मनपातील सर्व विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महापालिकेसमोर आंदोलन केले होते. त्यानंतर तरी अधिकारी व कर्मचाऱ्यांवरील दबाव कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र उलट अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुन्हा सतावले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कामाचा ताण वाढल्याने मनपातील एका महसूल निरीक्षकाने राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. ते निरीक्षक मंगळवारी राजीनामा पत्र घेऊन महापालिका आयुक्तांकडे सादर करणार होते. मात्र दिवसभर आयुक्त उपलब्ध न झाल्याने निरीक्षक माघारी फिरले. पण या प्रकाराची महापालिका वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.









