आशिया चषक हॉकी स्पर्धेत जपानविरुद्ध 2-1 फरकाने विजय, सुपर-4 फेरीत उत्तम सुरुवात
वृत्तसंस्था/ जकार्ता (इंडोनेशिया)
आशिया चषक पुरूषांच्या हॉकी स्पर्धेत शनिवारी येथे झालेल्या सुपर-4 लीगमधील पहिल्या सामन्यात भारतीय हॉकी संघाने जपानचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव करत प्राथमिक गटातील आपल्या मागील पराभवाची परतफेड केली. सुपर-4 टप्प्यात भारत, जपान, कोरिया आणि मलेशिया या चार संघांचा समावेश असून हे संघ प्रतिस्पर्धी संघाविरूद्ध एक सामना खेळणार असून त्यानंतर आघाडीचे दोन संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील.
या स्पर्धेतील यापूर्वी झालेल्या प्राथमिक गटातील सामन्यात जपानने माजी विजेत्या भारताचा 5-2 अशा गोलफरकाने पराभव केला होता. या पराभवाची परतफेड भारतीय हॉकी संघाने शनिवारी झालेल्या सुपर-4 लीगमधील पहिल्या सामन्यात केली.
शनिवारच्या सामन्यात भारतातर्फे मनजीतने आठव्या मिनिटाला तर पवन राजभरने 35 व्या मिनिटाला मैदानी गोल नोंदविले. जपानचा एकमेव गोल तेकुमा निवाने पेनल्टी कॉर्नरवर 18 व्या मिनिटाला नोंदविला. या लढतीमध्ये 13 व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला पण निलम जेझचा हल्ला जपानच्या बचावफळीने रोखला.
सामन्यातील आठव्या मिनिटाला मनजीतने मैदानी गोलवर भारताचे खाते उघडले. 18 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर जपानला मिळाला आणि त्यांच्या निवाने या संधीचा फायदा घेत आपल्या संघाला बरोबरी साधून दिली. मध्यंतरावेळी दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते. सामन्यातील 35 व्या मिनिटाला पवन राजबरने मैदानी गोल नोंदवित भारताला जपानवर 2-1 अशी आघाडी मिळवून दिली.
40 व्या मिनिटाला जपानला पेनल्टी कॉर्नर मिळाला पण तो वाया गेला. सामना संपण्यास तीन मिनिटे बाकी असताना जपानला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला पण भारताच्या बचावफळीने भक्कम कामगिरी करत जपानला संभाव्य गोलपासून वंचित केले. अखेर भारताने हा सामना 2-1 अशा फरकाने जिंकला. या स्पर्धेतील शनिवारी सुपर-4 लीग टप्प्यातील झालेल्या दुसऱया सामन्यात दक्षिण कोरियाने मलेशियाला 2-2 असे बरोबरीत रोखले.









