शनिवारीही जिजामाता चौकात गुडघाभर पाणी साचून
प्रतिनिधी/ बेळगाव
पहिल्याच पावसाने शहरातील गटारींची झालेली दुरवस्था उघडी पाडली. जुन्या पी. बी. रोडवरील जिजामाता चौकामध्ये गटारी आणि ड्रेनेजचे पाणी तुंबून होते. पाण्याला जाण्यासाठी वाट नसल्यामुळे शुक्रवारी सायंकाळपासून गुडघाभर पाणी साचून होते. शनिवारी महानगरपालिकेचे कर्मचारी या पाण्याला वाट करून देण्यासाठी धडपडत होते. मात्र पुढे गटार ब्लॉक झाल्यामुळे समस्या निर्माण झाली होती. नेहमीच या ठिकाणी पाणी साचून राहत आहे. याचबरोबर अनेक दुकानांमध्येही पाणी शिरत आहे. तेव्हा तातडीने मनपाने गटारी साफ कराव्यात, अशी मागणी होत आहे.
जुन्या पी. बी. रोडवर नवीन ओव्हरब्रिजची उभारणी करण्यात आली. मात्र ओव्हरब्रिज उभारताना सर्व्हिस रस्ता, तसेच गटारीदेखील करण्यात आल्या नाहीत. परिणामी पाणी पुढे जाण्यास वाटच उपलब्ध नाही. थोडा जरी पाऊस झाला तर ओव्हरब्रिजच्या परिसरात असलेल्या दुकानांमध्ये ड्रेनेज व गटारींचे पाणी शिरत आहे. त्यामुळे व्यावसायिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
दरवर्षी असाच प्रकार
शुक्रवारी झालेल्या पावसामुळे जिजामाता चौक येथे पाणी तुंबून होते. सीबीटीकडून आलेला संपूर्ण कचरा या ठिकाणी साचला होता. शनिवारी या रस्त्यावर सर्वत्र कचरा विखुरलेला होता. दरवर्षी असाच प्रकार घडत आहे. तेव्हा तातडीने गटारी खुल्या कराव्यात, अशी मागणी होत आहे. शनिवारी दिवसभर या या कर्मचाऱ्यांना दूषित पाण्यामध्ये थांबून काम करावे लागले. यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.









