महसूल विभाग लागला कामाला : महानगरपालिकेची महसूल तूट भरून निघणार?
बेळगाव : शहरातील मिळकतधारक वर्षानुवर्षे जुन्याच मोजमापानुसार मिळकतींच्या घरपट्टी भरत आहेत. पण बहुतांश मिळकती महापालिकेकडे नोंद असलेल्या मोजमापाव्यतिरिक्त अधिक जागेत बांधण्यात आल्या आहेत. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असून घरपट्टी वसुलीतही घट होत आहे. त्यामुळे शहर व उपनगरातील मिळकतींची फेरमोजणी करावी, अशी मागणी विरोधी गटनेते मुजम्मील डोणी यांनी मनपाच्या सर्वसाधारण बैठकीत केली होती. त्यानुसार गुरुवार दि. 15 पासून महसूल विभागाकडून मिळकतींची फेरमोजणी सुरू करण्यात आली आहे.
महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या शहर व उपनगरातील मिळकतधारकांकडून महापालिकेला दरवर्षी कर स्वरुपात घरपट्टी भरली जाते. मात्र, महापालिकेकडे नोंद असलेल्या जुन्या मोजमापावरून आजपर्यंत महापालिकेकडून घरपट्टी भरून घेतली जात होती. मात्र, प्रत्यक्षात बहुतांश मिळकतधारकांनी महापालिकेला कोणत्याही प्रकारची कल्पना न देता अतिरिक्त जागेत बांधकाम करण्यासह बहुमजली इमारतीदेखील उभारल्या आहेत. मात्र, त्यांच्याकडून पहिल्या मजल्याचे किंवा जुन्या पद्धतीने घरपट्टी भरली जात आहे. त्यामुळे महापालिकेचे घरपट्टीच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न घटले आहे.
यासाठी महापालिका अधिकाऱ्यांनी शहरातील मिळकतींची फेरमोजणी करून संबंधितांकडून सुधारित घरपट्टी आकारणी केल्यास महापालिकेला लाभ होईल. त्या दृष्टिकोनातून अधिकाऱ्यांनी पावले उचलावीत, अशी मागणी सर्वसाधारण बैठकीत विरोधी गटनेते मुजम्मील डोणी यांनी केली होती. त्याला सभागृहात इतर नगरसेवकांनीही पाठिंबा दिला होता. यावर महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी फेरमोजणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्यांनी महसूल विभागाला शहर व उपनगरातील मिळकतींची फेरमोजणी करण्याचा आदेश बजावला आहे.
वाढीव बांधकाम आढळल्यास सुधारित घरपट्टी चलन देणार
महसूल उपायुक्त रेश्मा तालिकोटी यांच्या सूचनेनुसार महसूल अधिकारी, महसूल निरीक्षक आणि बिल कलेक्टर शहरातील विविध मिळकतींना भेटी देऊन फेरमोजणी करत आहेत. गुरुवारपासून फेरमोजणीचे काम हाती घेण्यात आले आहे. वाढीव बांधकाम आढळून आल्यास संबंधितांना सुधारित घरपट्टी चलन दिले जाणार आहे.









