तांत्रिक समस्या : सुरू करण्यासाठी प्रयत्न
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था रॉयटर्सचे ‘एक्स’ अकाउंट भारतात ब्लॉक करण्यात आले आहे. रॉयटर्सचे एक्स अकाउंट ओपन करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित युजर्सना ‘कायदेशीर मागणीनुसार भारतात हे अकाउंट ब्लॉक करण्यात आले आहे’ असा संदेश दिसतो. तथापि, सरकारने रॉयटर्सचे अकाउंट ब्लॉक करण्यासाठी कोणताही नवीन आदेश दिलेला नसल्याचे सांगण्यात आले. भारत सरकारने रॉयटर्सचे अकाउंट ब्लॉक करण्याची कोणतीही मागणी केलेली नाही. आम्ही ‘एक्स’ कंपनीच्या संपर्कात असून ही समस्या लवकरात लवकर सोडविली जाईल असे रॉयटर्सने म्हटले आहे.
रॉयटर्स टेक न्यूज, रॉयटर्स फॅक्ट चेक, रॉयटर्स एशिया आणि रॉयटर्स चायना सारखी काही इतर एक्स अकाउंट भारतात सुरू आहेत. फक्त मुख्य अकाउंट आणि रॉयटर्स वर्ल्ड अकाउंट ब्लॉक केलेले दिसत आहे. मे महिन्यात ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान भारतातील काही सोशल मीडिया अकाउंट ब्लॉक करण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यावेळी अनेक अकाउंट ब्लॉक करण्यात आली होती. परंतु त्यावेळी रॉयटर्सचे अकाउंट ब्लॉक करण्यात आले नव्हते. आता ‘एक्स’ कंपनीने तोच जुना आदेश लागू केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








