वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
24 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या 2025 च्या टेनिस हंगामातील शेवटच्या अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत आयोजकांनी विजेत्यांना देण्यात येणाऱ्या बक्षीस रकमेत विक्रमी वाढ केली आहे. टेनिसच्या इतिहासामध्ये विजेत्यांसाठीची ही सर्वात मोठी बक्षीसाची रक्कम राहिल. 2024 च्या अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेतील बक्षीस रकमेच्या तुलनेत यावेळी 20 टक्के वाढ करण्यात आली आहे.
2025 च्या अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेतील पुरुष आणि महिलांच्या विभागातील विजेत्यांसाठी आता 90 दशलक्ष डॉलर्सची एकूण बक्षिसाची रक्कम जाहिर करण्यात आली आहे. चालू वर्षीच्या टेनिस हंगामामध्ये एटीपी आणि डब्ल्यूटीए टूरवरील मानांकनातील पुरुष आणि महिला टेनिसपटुंना आता बक्षिसाच्या रकमेत समानता राहिल. याचा लाभ मानांकनातील अव्वल टेनिसपटूंना निश्चित मिळेल. पण खालच्या स्तरावरील टेनिसपटू अद्यापही झगडत आहेत. 2024 च्या अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत एकूण बक्षिसाची रक्कम 75 दशलक्ष डॉलर्सची ठेवण्यात आली होती. पुरुष आणि महिलांच्या एकेरीतील विजेत्यांना प्रत्येकी 5 दशलक्ष डॉलर्सची रक्कम यावेळी दिली जाईल. गेल्या वर्षी या दोन्ही विभागातील विजेत्यांना समान प्रत्येकी 3.6 दशलक्ष डॉलर्सची रक्कम मिळाली होती. 2025 ची अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या कालावधीमध्ये थोडा विस्तार करण्यात आला आहे. चालू वर्षामध्ये या स्पर्धेत मिश्र दुहेरी प्रकारात नव्या फॉर्मेटची अंमलबजावणी केली जाईल. यावेळी या स्पर्धेमध्ये विविध देशांचे अव्वल पुरुष आणि महिला टेनिसपटू सहभागी होणार आहेत. प्रमुख ड्रॉ तील सामन्यांना प्रारंभ होण्यापूर्वी पात्र फेरीतील सामने दोन दिवस खेळविले जातील. गेल्या वर्षी या स्पर्धेत सुमारे 10 लाख टेनिस शौकिनांनी आपली विक्रमी उपस्थिती दर्शविली होती.









