कुलवळ्ळी भागातील शेतकऱ्यांची मागणी : भ्रष्ट अधिकऱ्यांवर कारवाईची मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
कुलवळ्ळी व आसपासच्या भागातील शेकडो एकर शेतजमीन आहे. काही जमीन सरकारी तर काही जमीन शेतकऱ्यांच्या नावे आहे. मात्र काही अधिकाऱ्यांच्या बेकायदेशीर कामामुळे सरकारच्या नावे असलेली जमीन व शेतकऱ्यांच्या नावे असलेली जमिनींवर इतरांची नावे लावण्यात आली असून हा शेतकऱ्यांवर मोठा अन्याय झाला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावर त्वरित लक्ष देऊन अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या नावावर या जमिनी होत्या, त्यांच्या नावे त्या पूर्ववतपणे कराव्यात. जर असे न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रीय शेतकरी संघाच्यावतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
कुलवळ्ळी व आसपासच्या भागात शेकडो एकर आहे. यापूर्वी काही जमिनी कर्नाटक सरकारच्या नावे तर काही जमिनी शेतकऱ्यांच्या नावे होत्या. पण आता सर्व्हे क्र. 146, 153, 216 शेतजमिनी सरकारच्या व शेतकऱ्यांच्या नावे होत्या. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शेतकऱ्यांकडे मालकी हक्क होते. मात्र आता 18 जून 2025 ते 4 ऑगस्ट 2025 आदेशाच्या नावाखाली मालकी हक्क बदलण्यात आले आहेत. याला सर्वस्वी बैलहोंगलचे प्रांताधिकारी, कित्तूरचे तहसीलदार व काही अधिकारी जबाबदार आहेत. येथील शेकडो एकर सरकारी व शेतकऱ्यांच्या जमिनी काही खासगी व्यक्तींशी संगनमत करून जमिनी हडपल्या आहेत. याबाबत 24 डिसेंबर 2024 रोजी कित्तूर पोलिसांत तक्रार केली तरी याची दखल घेण्यात आली नसून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
पण आता हे सहन करण्यापलिकडे गेले असून शेतकरी हे कृत्य कदापिही सहन करणार नाहीत. शेतकरी व सरकारी जमिनी बेकायदेशी नोंदणीकृत करण्यात आलेल्या जमिनी पूर्वीप्रमाणे शेतकऱ्यांच्या नावेच करण्यात याव्यात. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांची दखल घेऊन याचा गांभीर्याने विचार करावा. त्याचबरोबर बेकायदेशीरित्या काम करून सरकारची व शेतकऱ्यांची जमिनी हडपल्या. या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनातून देण्यात आला.









