कणबर्गी येथील शेतकऱ्यांची बुडा अधिकाऱ्यांकडे मागणी
बेळगाव : नगरविकास प्राधिकरणाकडून (बुडा) कणबर्गी निवासी योजना क्र. 61 वीस वर्षे उलटली तरीही पूर्ण करण्यात आलेली नाही. त्यामुळे योजनेचे काम तातडीने पूर्ण करून जमीन दिलेल्या शेतकऱ्यांना योग्य भरपाई द्यावी अन्यथा योजना रद्द करून जमीन परत द्यावी, अशी मागणी करत शेतकऱ्यांनी बुधवार दि. 29 रोजी बुडा अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले. कणबर्गी गावात निवासी योजना क्र. 61 राबविण्यासाठी 2007 मध्ये बुडाने शेतकऱ्यांच्या जमिनी संपादीत केल्या आहेत. मात्र अद्यापही योजना पूर्ण झालेली नाही. अधुनमधून काही दिवस काम सुरू केले जाते. मात्र त्यानंतर बरेच दिवस काम बंद ठेवले जाते. त्यामुळे ही योजना गेल्या 20 वर्षांपासून रेंगाळली आहे.
ग्रीन बेल्टची माहिती अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिली नाही. जमिनीच्या फोडी करण्यात न आल्याने शेतकऱ्यांना योग्य भरपाई दिली नाही. तसेच नोटीस न देताच शेतकऱ्यांना चुकीचे मार्गदर्शन केला जात असल्याचा आरोप देखील यावेळी शेतकऱ्यांनी केला. महेश शिगीहळ्ळी यांनी अद्याप टेंडर निश्चित झाले नसल्याचे अधिकाऱ्यांकडून उत्तर दिले जात असल्याचे सांगितले. तसेच टेंडर का निश्चित झाले नाही? यामध्ये कुणाचे किती टक्के कमिशन आहे? असा संशयही आता बळावत असल्याचा आरोप केला. एकंदरीत बुडावरील शेतकऱ्यांचा विश्वास उडाला आहे. गेल्या 20 वर्षांपासून रेंगाळलेली निवासी योजना अद्याप पूर्ण न झाल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. योजना सुरू होत नसेल तर आमच्या जमिनी परत करा, असा आग्रह शेतकऱ्यांनी यावेळी केला. 20 वर्षांपासून टेंडर निश्चित होत नसेल तर निवासी योजना रद्द करून जमिनी परत कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.









