राज्य नेगीलू योगी रयत सेवा संघातर्फे मागणीचे निवेदन, अन्यथा आंदोलनाचा इशारा
खानापूर : तालुक्यातील अवरोळी येथील सर्वेनंबर 141 मधील 136 एकर जमीन सरकार दरबारी गायरान म्हणून नेंद होती. मात्र अलीकडे रुद्रस्वामी मठाच्या नावाने ही जमीन करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. ही जमीन पुन्हा सरकारजमा करून याच्यावर गायरान म्हणून पुन्हा नोंद करण्यात यावी, अन्यथा तहसीलदार कार्यालयासमोर उग्र आंदोलन करण्याचा इशारा राज्य नेगीलू योगी रयत सेवा संघाच्यावतीने तहसीलदार दुंडाप्पा कोमार यांना निवेदन देवून करण्यात आली आहे. तहसीलदार दुंडाप्पा कोमार यांनी निवेदनाचा स्वीकार करून आपण नुकताच पदभार स्वीकारलेला आहे. याबाबत कागदपत्रांची पडताळणी करू, असे आश्वासन दिले आहे. तालुक्यातील अवरोळी येथील सर्वेनंबर 141 मधील 136 एकर जमिनीवर गायरान म्हणून नोंद होती.
त्यामुळे ही 136 एकर जमीन गावची आणि सरकारची होती. मात्र अलीकडे काही वर्षापूर्वी या उताऱ्यात रुद्रस्वामी मठाच्या मठाधीशांचे नाव दाखल झाले आहे. हे नाव कसे दाखल झाले, याची संपूर्ण चौकशी करण्यात यावी, कोणते अधिकारी यात सहभागी आहेत. हे उघड करण्यात यावे, तसेच या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषीवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. याबाबत बोलताना नेगीलू रयत संघाचे राज्याध्यक्ष रवि पाटील म्हणाले, अवरोळी येथील 136 एकर जमीन गायरान म्हणून शेकडो वर्षापासून नोंद आहे. मात्र आता या जमिनीच्या उताऱ्यावर रुद्रस्वामी देवस्थानच्या मठाधीशांचे नाव दाखल झाले आहे. गायरान हे नाव कोणत्या आधारे तुम्ही केले आणि स्वामीजींचे नाव कसे दाखल झाले. याची संपूर्ण चौकशी तहसीलदारानी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी.
जागा बळकावण्याचा धोका
सदर जमीन पुन्हा गायरान म्हणून हस्तांतर करण्यात यावी, अवरोळी मठाचे स्वामी 136 एकरचे मालक असल्याचे भासवत आहेत. या ठिकाणी त्यांनी नव्याने मठ बांधकाम हाती घेतले आहे. त्यामुळे भविष्यात ही जागा स्वामीजी बळकावण्याचा धोका निर्माण झाला आहे. यासाठी सखोल चौकशी करून तातडीने याबाबत निर्णय घेण्यात यावा. आठ दिवसात याबाबत कारवाई झाली नसल्यास तहसीलदार कार्यालयासमोर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा नेगीलू रयत संघाचे राज्याध्यक्ष रवि पाटील यांनी दिला आहे.









