पुणे / प्रतिनिधी
नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच सुरू होणार आहे. मान्सून 15 ते 20 सप्टेंबरदरम्यान राजस्थान येथून, तर महाराष्ट्रातून सप्टेंबरच्या शेवटी परतेल असा अंदाज निवृत्त हवामानतज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी वर्तविला आहे.
सप्टेंबरमध्ये वायव्य भारतातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो. यंदा 15 ते 19 सप्टेंबरदरम्यान परतीचा पाऊस राजस्थान त्यापाठोपाठ पंजाब, हरियाणा, गुजरात या भागातून माघारी फिरेल. महाराष्ट्रातून सप्टेंबरचा शेवटचा आठवडा- ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातून तो माघारी परतेल. विदर्भ, त्यापाठोपाठ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व सर्वांत शेवटी कोकणातून पाऊस माघारी फिरेल. 12 सप्टेबरनंतर राज्यातील पाऊस कमी होणार आहे. राज्यात सध्या अनेक भागात अतिरिक्त पाऊस झाला आहे. सप्टेंबरमध्ये चांगल्या पावसाची अपेक्षा आहे, असे कश्यपी यांनी सांगितले.
वर्षाच्या शेवटी ला निनो
या वर्षाच्या शेवटी ला निनो उद्भवणार असल्याचे भाकित जागतिक हवामान संघटनेने वर्तविले आहे. प्रशांत महासागरातील एल निनोची स्थिती सध्या तटस्थ असून, सप्टेंबर-नोव्हेंबरमध्ये ती ला निनोकडे झुकण्याची शक्यता आहे. दरम्यान, ला निनोमुळे यंदाचा हिवाळा गारेगार राहण्याची शक्यता वर्तविण्यत आली आहे.









