सांगली :
काही दिवस वेग मंदावल्यानंतर मान्सूनच्या पावसाचे गुरूवारी सांगली, मिरज शहरासह जिल्ह्यात जोरदार पुनरागमन झाले आहे. गुरूवारी सायंकाळनंतर अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. आगामी चोवीस तासात सांगलीसह कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. एकाच दिवसातील मुसळधारेने नागरिकांची दैना उडाली. तर मिरज तालुक्यातील चार गावांचा संपर्क तुटला. दिवसभर ढगाळ वातावरणामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे.
मे महिन्याच्या शेवटच्या आठवडयात मुसळधार सुरूवात झाल्यानंतर काही दिवस पावसाने उघडीप दिली होती. बुधवारपासून काही भागात सुरूवात झाली. परंतु गुरूवारी सायंकाळनंतर जोरदार बॅटींग सुरू केली. गुरूवारी पहाटेपासूनच सांगली शहरात मुसळधार पावसाला सुरूवात झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. चौकासह मुख्यरस्ते जलमय झाले.
मिरजेसह तालुक्याच्या बहुतांशी भागात धोधो पाऊस बरसला. शहर जलमय झाले. बेडग आणि नरवाड येथे मुख्य ओढ्यावऊन पाणी वाहत होते. रात्री उशिरापर्यंत मंगसूळी, लक्ष्मीवाडी, नरवाड, गायरानवाडी या चार गावांचा संपर्क तुटला. नरवाड व सलगरेत रेल्वे पुलाखाली सुमारे तीन पुटांपर्यंत पाणी तुंबून राहिले. मान्सूनच्या हजेरीनंतर झालेल्या पहिल्याच पावसात शहरासह ग्रामीण भागाची दैना उडाली. मालगांव, सुभाषनगर, खंडेराजुरी, सोनी, भोसे, कळंबी, शिपूर, सलगरे, बेळंकी, टाकळी, आरग, बेडग, म्हैसाळ व नरवाड या गावांमध्येही जोरदार पाऊस झाला. नरवाड आणि सलगरे येथील रेल्वेच्या ओव्हर ब्रिजखाली सुमारे तीन ते चार फुटापर्यंत पावसाचे पाणी तुंबून राहिले. यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागली.
बेडग येथे अनेक पानमळे व द्राक्षबागांमध्ये पाणी तुंबून राहिले. ओढ्याचे पाणी शेतात शिरल्याने भाजीपाला वाहून गेला. द्राक्षबाग उन्मळून पडल्या. पानमळ्यांचे नुकसान झाले. मान्सूनचा पाऊस शेतकऱ्यांसाठी फायदाचा ठरणार आहे. पावसामुळे शेतशिवार ओलेचिंब झाले असून, शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग सुरू झाली आहे. मात्र पाऊस सलग असाच सुरू राहिला तर मात्र पेरणी प्रक्रियेतही व्यत्यय येण्याची शक्यता आहे. म्हैसाळ सह परिसराला गुरूवारी दुपारी तब्बल दीड तास मुसळधार पावसाने झोडपून काढले.
- इस्लामपूर परिसराला विजांच्या गडगडाटासह झोडपले
वाळवा तालुक्यासह इस्लामपूर शहरात विजांच्या गडगडाटासह पावसाने गुरुवारी दुपारी हजेरी लावली. दुपारी 3 च्या सुमारास पाऊस झाला. काही काळ विश्रांती नंतर सायंकाळी पुन्हा मुसळधार पावसाने सुऊवात केली. त्यानंतर ही विजांचा गडगडाट सुरुच होता. दरम्यान वीज पुरवठा खंडीत झाला होता. गुरुवारचा आठवडा बाजार असल्याने दुपारी अचानक आलेल्या पावसाने व्यापाऱ्यांची दैना उडाली. याशिवाय खानापूर, पलुस, कुंडल परिसरातही जोरदार पाऊस झाला. जत तालुक्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. तर ढगाळ वातावरणामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे.








