चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता
पणजी : परतीच्या पावसाचा धुमाकूळ गोव्यात होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्याचे चक्रीवादळात ऊपांतर होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे पुढील 4 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने मात्र अद्याप तसा इशारा दिलेला नाही. रविवारी सांखळीत मुसळधार 2 इंच पाऊस झाला. सोमवारी गोव्यातील अनेक भागात दुपारपासून सायंकाळपर्यंत पाऊस पडला. आज व उद्या देखील गोव्यात विजांच्या लखलखाटासह जोरदार पाऊस पडणार आहे. हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. परतीच्या पावसाबरोबरच अरबी समुद्रात एक नवे चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. लक्षद्वीपच्या बाजूला मोठ्या प्रमाणात पावसाळी ढग जमा झालेले आहेत. त्यातून कमी दाबाचा पट्टा निर्माण होईल आणि दि. 21 ऑक्टोबर रोजी त्याचे वादळात ऊपांतर होईल असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे पुढील 4 दिवसांमध्ये गोव्यात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातील या नैसर्गिक हालचालींमुळे समुद्र खवळलेला आहे आणि हवामान खात्याने मच्छीमारांना खोल समुद्रात जाऊ नये, असा इशारा दिलेला आहे. दरम्यान, रविवारी गोव्यात अनेक भागात जोरदार पाऊस झाला. सांखळीमध्ये 2 इंच, सांगे 1 इंच, केपे पाऊण इंच व पेडणेमध्ये अर्धा सें.मी. एवढी पावसाची नोंद झाली. सोमवारी सायंकाळी सांखळीत पुन्हा एकदा जोरदार पाऊस पडला. पणजीमध्ये किंचित तर पेडणेतील काही भागात तसेच माशेल भागातही जोरदार पाऊस झाल्याचे वृत्त आहे. मडगावातही जोरदार पाऊस पडला. पुढील 24 तासांत म्हणजेच आज सायंकाळी पुन्हा एकदा गोव्यात परतीच्या पावसाचा अनुभव मिळणार आहे.









