मनोज तिवारीचा क्रिकेटला अलविदा : आता फक्त राज्याचे मंत्रीपद सांभाळणार
वृत्तसंस्था /कोलकाता
भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू मनोज तिवारीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यांनी ही माहिती दिली. मनोजने टीम इंडियासाठी 12 एकदिवसीय आणि 3 टी-20 सामने खेळले आहेत. तिवारीने 2015 मध्ये टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला होता. देशांतर्गत सामन्यांमध्ये तो बंगालकडून खेळत होता. स्थानिक क्रिकेटमध्ये तिवारीचे रेकॉर्ड अप्रतिम आहे. विशेष म्हणजे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये तो सध्या क्रीडामंत्री आहे. तिवारीने सोशल मीडियावर टीम इंडियाच्या जर्सीमधील फोटो पोस्ट केला आहे. त्यासोबत निवृत्तीबाबतची पोस्ट शेअर केली आहे. मी क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. क्रिकेटने मला खूप काही दिले असून मी जी काही स्वप्ने पाहिली होती, ती क्रिकेटमुळेच पूर्ण झाली आहेत. लहानपासून मला प्रशिक्षण देणाऱ्या सर्व प्रशिक्षकांचे मनापासून आभार. माझ्या सर्व यशामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे, अशी पोस्ट त्याने सोशल मीडियावर केली आहे. क्रिकेटला अलविदा केल्यानंतर आता फक्त क्रीडामंत्रीपद सांभाळणार असल्याचे त्याने म्हटले आहे.
तिवारीची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
मनोज तिवारी टीम इंडियाकडून 12 वनडे सामने खेळला आहे. या 12 सामन्यात त्याने 287 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक व एका अर्धशतकाचा समावेश आहे. याशिवाय, 3 टी-20 सामन्यातही त्याने टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच 141 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 9908 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने त्रिशतकही ठोकले आहे. नाबाद 303 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. मनोजने या फॉरमॅटमध्ये 29 शतके आणि 45 अर्धशतके केली आहेत. याशिवाय, लिस्ट ए च्या 169 सामन्यात 5581 धावा केल्या आहेत. यामध्ये 6 शतके आणि 40 अर्धशतके केली आहेत. मनोजने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. तिवारीने भारतासाठी अखेरचा वनडे सामना 2015 मध्ये झिम्बाब्वेविरोधात खेळला. तर सप्टेंबर 2012 मध्ये त्याने न्यूझीलंडविरोधात अखेरचा टी-20 सामना खेळला आहे.









