जिम्नॅस्टिक जीवनाचा अविभाज्य भाग पण थांबण्याची हीच योग्य वेळ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताची जिम्नॅस्टिक स्टार दीपा करमाकरने निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने ही माहिती दिली. 2016 मधील रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत तिने अद्वितीय अशी कामगिरी करत अवघ्या भारतवासियांना थक्क केले. तिच्यामुळे भारतभर जिम्नॅस्टिकचे वारे वाहिले. पण, रिओ ऑलिम्पिकनंतर दीपाला दुखापतीमुळे कारकिर्दीत फारसे यश मिळवता आले नाही आणि सोमवारी तिने अचानक निवृत्ती जाहीर केली. विशेष म्हणजे, त्रिपुराच्या या 31 वर्षीय खेळाडूने भारतीय जिम्नॅस्टिक क्षेत्राला खऱ्या अर्थाने नवी ओळख करुन दिली व अनेक तरुणांना तिच्या पाऊलावर पाऊल ठेवण्यासाठी प्रेरित केले.
भारतासाठी अनेक पदके जिंकणाऱ्या दीपाने सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या निवृत्तीची घोषणा केली. खूप विचार आणि चिंतनानंतर मी व्यावसायिक जिम्नॅस्टिकमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय माझ्यासाठी नक्की सोपा नव्हता, पण हीच ती योग्य वेळ आहे. जोपर्यंत मला आठवत आहे, जिम्नॅस्टिक हा माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग राहिला आहे. प्रत्येक क्षण मी पुरेपूर जगला आहे.
जिम्नॅस्टिक अविभाज्य भाग
दीपाचा पाय जन्मत: सपाट होता, पण तरीही तिने अशक्य कामगिरी शक्य करुन दाखवली. दीपाचे पाय पाहून ती जिम्नॅस्टिक करेल, असे कोणालाही वाटले नव्हते. कारण शारीरिकदृष्ट्या तिला ही गोष्ट करणे जवळपास अशक्य होते. पण दीपाने हार मानली नाही. अथक मेहनत करत तिने भारतामधील जिम्नॅस्टीकला एक मोठे स्थान मिळवून दिले. जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणे आणि पदके जिंकणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रिओ ऑलिम्पिकमध्ये प्रोड्युनोव्हा व्हॉल्ट कामगिरी करणे हा माझ्या कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय क्षण ठरला असल्याचे तिने म्हटले आहे.
खेळाशी अतूट नाते अन् कारकिर्दीला निरोप
जिम्नॅस्टिक ही दीपाची पहिली पसंती नव्हती पण वडिलांनी तिला प्रोत्साहित केले. मेहनतीच्या जोरावर तिने ज्युनियर नॅशनल स्पर्धा, वर्ल्डकप, आशियाई चॅम्पियनशिप, राष्ट्रकुल स्पर्धेत यश मिळवले. याशिवाय, 2016 मधील रिओ ऑलिम्पिकमध्ये प्रोड्युनोव्हा व्हॉल्ट या आव्हानात्मक प्रकारात लक्षवेधी कामगिरी केली. अवघ्या 0.15 सेकंदानी तिचे कांस्यपदक हुकले व तिला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. रिओ ऑलिम्पिकनंतर मात्र सततच्या दुखापतीमुळे तिला सातत्याने बाहेर बसावे लागले. यानंतर सोमवारी तिने हीच योग्य वेळ असल्याचे सांगत आपल्या कारकिर्दीला निरोप दिला.
प्रतिक्रिया
माझा शेवटचा विजय, ताश्कंदमधील आशियाई जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिप हा एक टर्निंग पॉइंट होता. तोपर्यंत मला वाटले की मी माझ्या शरीराला आणखी पुढे ढकलू शकेन. परंतु कधीकधी आपले शरीर आपल्याला सांगते की विश्रांती घेण्याची वेळ आली आहे. पण मन अजूनही सहमत नाही. मी निवृत्त होत असले तरी माझा जिम्नॅस्टिकशी असलेला संबंध संपणार नाही. मला या खेळाला काहीतरी परत द्यायचे आहे. कदाचित मार्गदर्शन, प्रशिक्षण किंवा माझ्यासारख्या इतर मुलींना पाठिंबा देईन.
महिलांच्या जिम्नॅस्टिक्समध्ये दीपाचे यश
आशियाई चॅम्पियनशिप – 2024 मध्ये सुवर्ण
वर्ल्ड कप 2018 मध्ये सुवर्ण
वर्ल्ड कप 2018 मध्ये कांस्यपदक
आशियाई चॅम्पियनशिप 2015 मध्ये कांस्यपदक
कॉमनवेल्थ गेम्स 2014 मध्ये कांस्य