नोकरी करणारी माणसे त्यांच्या वयाच्या 58 ते 60 व्या वर्षी निवृत्त होतात, हे सर्वात माहीत आहे. व्यक्ती सर्वोच्च न्यायालयाची न्यायाधीश असेल तर निवृत्तीवय 64 वर्षे असते. काही क्षेत्रांमध्ये सत्तरी पार केलेल्या व्यक्तीही नोकरी करताना दिसतात. तथापि, एकादी व्यक्ती वयाच्या 12 व्या वर्षी निवृत्त झालेली आहे, असे समजल्यास त्यावर आपला विश्वास बसणे अशक्य आहे.
तथापि, अशी घटना सध्या घडत आहे. ऑस्ट्रेलियाची नागरीक पिक्सी कार्टीस ही अवघी 12 वर्षांची आहे. एवढ्या कमी वयातच तिने नामांकित व्यावसायिक म्हणून ख्याती प्राप्त केलेली आहे. इतकेच नव्हे, तर आता तिने काम करणेही थांबविले असून एकप्रकारे निवृत्ती स्वीकारलेली आहे. आता ती केवळ विमान प्रवास करुन भिन्न भिन्न देशांमध्ये पर्यटक म्हणून जाते आणि ‘लाईफ एंजॉय’ करत आहे. ती शाळा, शिक्षण किंवा अन्य कोणतेही काम करत नाही.
या वयातच ती कोट्याधीश आहे. ही संपत्ती तिला वारसाअधिकाराने मिळालेली नाही. तर ती तिने स्वत: कमावलेली आहे. ती जन्मला आली तेव्हा तिच्या आईने तिच्या नावाने ‘पिक्सी बो’ नामक व्यवसायाचा प्रारंभ केला. पिक्सीने ‘फिजेट स्पिनर्स’ ची मोठ्या प्रमाणात विक्री कोरोनामुळे निर्माण झालेल्या लॉकडाऊनच्या काळात केली. यातून तिला एक कोटी डॉलर्सचा लाभ झाला अशी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता तिला काहीही काम करण्याची आवश्यकता उरलेली नाही. कदाचित ती जगातील सर्वात कमी वयाची स्वकष्टार्जित कोट्याधींश असावी अशी चर्चा आहे. सोशल मिडियावर तिचे लक्षावधी फॉलोअर्स आहेत.









