विंडीजचा निकोलस पूरन मुंबई न्यूयॉर्क संघाचा कर्णधार
वृत्तसंस्था/ मुंबई, न्यूयॉर्क
वेस्ट इंडिजचा स्टार फलंदाज 29 वर्षीय निकोलस पूरनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर करून सर्वांना आश्चर्यचकित केले. पण, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर काही तासांतच त्याला कर्णधार बनवल्याची बातमीही समोर आली आहे. निवृत्तीनंतर आता मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने त्याच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. पूरनला मेजर लीग क्रिकेटमध्ये मुंबई इंडियन्स न्यूयॉर्कचा कर्णधार बनवण्यात आले आहे. बुधवारी याबाबतची घोषणा करण्यात आली. गत हंगामात या स्पर्धेत मुंबईचे नेतृत्व केरॉन पोलार्डने केले होते.
पूरनने गेल्या 2 हंगामात एमआय न्यूयॉर्कसाठी खेळाडू म्हणून 15 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 39 षटकार आणि 38 चौकारांसह 1 शतक आणि 3 अर्धशतकांसह 568 धावा केल्या आहेत. पूरनसाठी सर्वात शानदार हंगाम एमएलसी 2023 चा होता, जिथे तो केवळ सर्वाधिक धावा करणारा खेळाडू नव्हता तर त्याच्या बॅटमधून सर्वाधिक 34 षटकारही आले होते. एमआय न्यूयॉर्कने एमएलसी 2023 चा अंतिम सामना जिंकला, ज्यामध्ये निकोलस पूरनने 55 चेंडूत 249 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने 137 धावा केल्या. त्याच्या खेळीत 10 चौकार आणि 13 षटकारांचा समावेश होता. याशिवाय, 2024 च्या हंगामात देखील त्याने शानदार कामगिरी साकारली होती. यंदा मात्र एमएलसी 2025 मध्ये निकोलस पूरनची जबाबदारी दुप्पट असेल. येथे त्याला केवळ खेळाडू म्हणूनच नव्हे तर संघाचा कर्णधार म्हणूनही छाप पाडावी लागेल.









