त्यांना कोडोली येथे खासगी रुग्णालयात दाखल केले
नावली : नावली (ता. पन्हाळा) येथे बहिणीने केलेल्या प्रेमविवाहाच्या रागातून सेवानिवृत्त सैनिक असणाऱ्या नीलेश राजाराम मोहिते याने बहिणीचा पती विनोद अशोक पाटील यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना कोडोली येथे खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. याची नोंद कोडोली पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, नीलेश मोहिते याच्या बहिणीने 2014 साली विनोद पाटील यांच्याशी प्रेमविवाह केला होता. यामुळे नीलेश मोहिते व विनोद पाटील यांच्यात वारंवार वाद होत होते. दोघांचे घर जवळजवळ आहे.
दोन्ही घरांच्या मध्ये असलेल्या लोखंडी जाळीला नीलेश मोहिते पोस्टर लावून बंद करत होता. यावेळी विनोद याने नीलेश याला पोस्टर का लावत आहेत, याचा जाब विचारला. याचा राग आल्याने नीलेश याने विनोद याला शिवीगाळ केली. तसेच घरातील पिस्तूल घेऊन येऊन तुला जिवंत ठेवत नाही असे म्हणून हवेत गोळीबार केला.
दुसऱ्यांदा गोळी झाडली असता विनोद यांच्या उजव्या मांडीत घुसली. यामध्ये विनोद गंभीर जखमी झाले. त्यांना कोडोलीतील खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनचे गांभीर्य ओळखून डीवायएसपी आप्पासो पोवार यांनी घटनास्थळी भेट दिली.








