साक्षीदारांना साक्ष नोंदविण्याचे आवाहन
बेळगाव : पंचमसाली समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सुवर्ण विधानसौधसमोर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जची न्यायालयीन चौकशी सुरू झाली आहे. 18 ऑगस्टपासूनच सुवर्ण विधानसौधमध्ये चौकशीला प्रारंभ झाला असून साक्षी नोंदविण्यात येत आहेत. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड येथील न्यायपीठासमोर दाखल झालेल्या रिट याचिकेवर 10 जुलै रोजी निकाल झाला होता. न्यायालयीन चौकशीचा आदेश देण्यात आला होता. त्यानुसार राज्य सरकारने निवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बन्नीकट्टी हणमंतप्पा आर. यांची एक सदस्य चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. निवृत्त न्यायाधीश बन्नीकट्टी हणमंतप्पा आर. यांनी 18 ऑगस्टपासून साक्षीदारांची चौकशी सुरू केली असून ही प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. सुवर्ण विधानसौधमधील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या 219 क्रमांकाच्या कक्षात सकाळी 10 ते सायंकाळी 5 यावेळेत आयोगाचे कामकाज सुरू आहे.
या काळात आयोगासमोर हजर होऊन इच्छुकांनी साक्ष व पुरावे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्यावर्षी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात पंचमसाली समाजाला 2ए आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन छेडण्यात आले होते. 10 डिसेंबर 2024 रोजी कुडलसंगम येथील जगद्गुरु बसवजय मृत्युंजय स्वामीजींच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनावेळी पोलिसांनी लाठीहल्ला केला होता. लाठीहल्ल्यात अनेक जण जखमी झाले होते. या प्रकरणाची चौकशी व्हावी, लाठीहल्ला करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड न्यायपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाच्या आदेशावरून या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात झाली असून एक सदस्य चौकशी आयोगासमोर साक्षी नोंदविण्याचे काम सुरू आहे. इच्छुकांनी आयोगासमोर साक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.









