सिंधुदुर्ग पोलीस दलाच्यावतीने मानवंदना!
ओटवणे | प्रतिनिधी
सावंतवाडी तालुक्यातील देवसू पलिकडचीवाडी येथील सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर नारायण सावंत (७५) यांचे सोमवारी सायंकाळी गोवा बांबोळी रुग्णालयात निधन झाले. सुरुवातीला त्यांच्यावर मणिपाल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती औषध उपचारांना साथ देत नसल्यामुळे बांबोळी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. मनोहर सावंत हे १९७६ साली मुंबईत एस. आर. पी. एफ. ग्रुप ८ मध्ये भरती झाले होते. त्यानंतर १९ ८२ मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस खात्यात त्यांची बदली झाली होती. या दरम्यान त्यांनी वैभववाडी, बांदा, ओरोस पोलीस स्थानकात सेवा बजावत सन २०११ मध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावरून सेवानिवृत्त झाले होते. गावातील सामाजिक कार्य त्यांचा सक्रिय सहभाग होता.
सिंधुदुर्ग पोलीस दलातर्फे मानवंदना
महाराष्ट्र राज्यातील सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी अधिकारी यांना त्यांच्या निधनानंतर कुटुंबीयांना व समाजातील इतर नागरिकांना त्यांच्या कर्तव्यनिष्ठापूर्वक सेवेची आठवण व्हावी त्यांचा गौरव व्हावा व सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार व्हावेत यासाठी महाराष्ट्र राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी २१ जुलै २०२५ रोजी सुधारित आदेश व नियमावली जारी केले आहेत. या नियमावली नुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही प्रथमच घटना असल्याने सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर अतिरिक्त पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे, सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, पोलीस हवालदार दीपक शिंदे, संतोष गलोले, मनिश शिंदे यांनी मंगळवारी सकाळी देवसू येथे जात मनोहर सावंत यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहत मानवंदना दिली. यावेळी सिंधुदुर्ग पोलीस दलातर्फे शोकसंदेश मनोहर सावंत यांच्या कुटुंबीयाकडे देण्यात आला. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सरपंच रुपेश सावंत, माजी सैनिक डॉ. लवू सावंत, देवस्थान मानकरी विठ्ठल सावंत, पोलीस पाटील प्रवीण सावंत तसेच देवसू पंचक्रोशीतील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेत सावंत कुटुंबीयांचे सांत्वन केले. सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सावंतवाडी पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्रा. रवींद्र सावंत यांचे ते वडील, अशोक सावंत यांचे ते भाऊ तर एकनाथ सावंत, रामा सावंत, संजय सावंत, सुरेश सावंत, मेघनाथ सावंत यांचे ते काका होत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, पाच मुली, सुन, एक भाऊ, जावई, भावजय, पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.









