ओरोस :
एका पोलिसाला मारहाण करून सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त अब्दुलकादर अबुबक्कर खान (62, रा. मीरा भाईंदर) याला दोन विविध कलमांखाली प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत गायकवाड यांनी एकूण सहा हजार रुपये दंड आणि शुक्रवारी कोर्ट उठेपर्यंत कोर्टात बसून राहण्याची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता रुपेश देसाई यांनी काम पाहिले.
30 सप्टेंबर 2016 रोजी अब्दुलकादर खान व अन्य 20 ते 25 लोकांचा जमाव आसीफ शेख यांच्या बंगल्यात घुसला होता. यावेळी अधिक बंदोबस्त आवश्यक असल्याने बांदा–कट्टा येथे ट्रॅफिक ड्यूटीवर असलेल्या विनोद चव्हाण यांना तेथे पाठविण्यात आले होते. यावेळी चव्हाण यांच्यासह उपस्थित पोलिसांनी बंगल्यात घुसलेल्या जमावाला बाहेर काढून पोलीस ठाण्यात नेले होते.
दरम्यान आसीफ शेख यांची तक्रार नोंदविण्याचे काम सुरू असताना जमावातील पुरुष व्यक्तींची नावे लिहून घेण्याचे काम विनोद चव्हाण यांच्याकडे देण्यात आले होते. यावेळी विनोद चव्हाण यांनी ठाणे अंमलदार कक्षाच्या बाजूला बसलेल्या अब्दुलकादर खान यांना त्यांचे नाव विचारले असता त्यांनी ‘तू माझे नाव विचारणारा कोण?’ असा सवाल विनोद चव्हाण यांना करीत दम दिला होता. तसेच धक्काबुक्की करून हाताच्या ठोशाने त्यांना मारहाण केली होती. या प्रकरणी बांदा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक विनोद चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अब्दुलकादर खान याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात झालेल्या याबाबतच्या खटल्याच्या सुनावणीत न्यायालयाने खान याला भा. दं. वि. कलम 353 आणि 332 खाली दोषी धरून दोन्ही कलमान्वये प्रत्येकी 3000 हजार याप्रमाणे एकूण सहा हजार रुपये दंड ठोठावला. तसेच शुक्रवारी न्यायालयीन कामकाज संपेपर्यंत न्यायालयात बसून राहण्याचे आदेश दिले.








