प्रतिनिधी / बेळगाव : सरकारी वकील पदासाठी परीक्षा घेण्यात आल्या. मात्र या परीक्षा नियमानुसार आणि शिस्तबद्धरित्या पार पडल्या नाहीत. चुकीच्या पद्धतीने या परीक्षा घेण्यात आल्या आहेत. तेव्हा तातडीने पुन्हा परीक्षा घ्याव्यात या मागणीसाठी बेळगाव बार असोसिएशन आणि वकिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढुन निवेदन दिले आहे.
संपूर्ण राज्यातील विविध न्यायालयांमध्ये सरकारी वकील पदे रिक्त आहेत. त्या पदांवर नियुक्ती करण्यासाठी अनेक उमेदवारांच्या परीक्षा घेण्यात आली होती. मात्र प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका योग्यप्रकारे जोडून देण्यात आली नाही. केवळ या दोन्हीला एक टाचण मारून देण्यात आली होती. त्यामुळे उत्तर पत्रिका किंवा प्रश्नपत्रिका गहाळ होवू शकते. तेव्हा ही पद्धत चुकीची आहे. तेव्हा पुन्हा या परीक्षा घ्याव्यात या मागणीसाठी हे निवेदन देण्यात आले आहे.
या परीक्षेमधील प्रश्नपत्रिकेमध्ये अनेक चुका आहेत. त्यामुळे उमेदवारांना परीक्षा देणे देखील कठिण झाले. तेव्हा याचा सारासार गांभिर्याने विचार करून तातडीने ही परीक्षा रद्द करा असेही या निवेदनात म्हटले आहे. तेव्हा पुन्हा परीक्षा घ्या अशी मागणी करण्यात आली. शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रभू यतनट्टी, जनरल सेक्रेटरी गिरीराज पाटील. सदस्य अॅड. इरफान बयाळ, अॅड. सुनिल काकतकर, यांच्यासह वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.









