कचरावाहू वाहनांच्या चालक-क्लिनरांची मागणी : आयुक्त-आमदारांना निवेदन
बेळगाव : बेळगाव महापालिकेत सफाई कामगारांबरोबर वाहनातून कचऱ्याची उचल करण्यासाठी वाहनावर नेमण्यात आलेल्या चालक व क्लिनरला वेतनवाढ करा, सेवेत कायम करा, अशी मागणी सध्या जोर धरली आहे. या मागणीसाठी वाहनचालक व क्लिनरनी गुरुवार दि. 5 रोजी महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीच्यावेळी सभागृहाबाहेर ठिय्या मांडला. त्यानंतर आपल्या मागणीचे निवेदन महापौर व आमदारांना दिले. महापालिकेत अलीकडेच 155 सफाई कामगारांना सेवेत कायम करण्यात आले आहे. त्यानंतर आता आणखी शंभर सफाई कामगारांची नेमणूक करण्यात येणार आहे. सरकारच्या आदेशानुसार सफाई कामगारांबरोबर कंत्राटी पद्धतीने काम करणारे वाहनचालक व क्लिनर यांच्या हिताचा महापालिकेने विचार करावा. सेवेत कायम करावे व वेतनवाढ करावी, अशी मागणी करत आंदोलन केले. कुमार दोडमनी, रवी कोलकार, मंजू अवरादी, रमेश बसापूर, संजय चव्हाण, एम. के. शेख, संदीप कोलकार, सागर देसूरकर, प्रकाश खनगावकर, रवींद्र रेडेकर आदींसह इतरांचा आंदोलनामध्ये सहभाग होता.
मागण्यांची पूर्तता करण्याचा आदेश
3 डिसेंबर रोजी विधानसभेमध्ये झालेल्या सभेमध्ये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सेवा बजावत असलेले सफाई कामगार, वाहनचालक, लीडर्स, क्लिनर्स, पाणीपुरवठा करणारे कर्मचारी यासारख्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या लक्षात घेऊन त्यांची पूर्तता करण्याचा आदेश नगरविकास खात्याच्या सचिवांनी नगरप्रशासन विभाग संचालकांना दिला आहे.









