दिव्यांगांचे आंदोलन, किमान वेतनाची मागणी
बेळगाव : दिव्यांग आणि ग्रामीण पुनर्वसन कामगारांना नोकरीत कायमस्वरुपी करण्याबरोबर किमान वेतन देण्यात यावे, या मागणीसाठी शुक्रवारी विधानसौध परिसरात दिव्यांग गौरवधन कार्यकर्ता संघातर्फे आंदोलन छेडण्यात आले. तालुका ग्रामीण आणि शहरी भागात पुनर्वसन कामगार म्हणून दिव्यांग व्यक्ती कार्यरत आहेत. त्यांना तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनात अडचणी येऊ लागल्या आहेत. मागील 15 वर्षांपासून विविध ठिकाणी दिव्यांग कार्यरत आहेत. मात्र या दिव्यांगांच्या कल्याणासाठी सरकारकडून कोणत्याच सुविधा पुरविल्या जात नाहीत. राज्य सरकारने सातवा वेतन आयोग लागू करून सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ केली आहे. मात्र ग्राम पंचायत, वाचनालय, माहिती केंद्र, ग्रंथालय, आदी ठिकाणी कार्यरत असलेल्यांच्या मानधनात वाढ झाली आहे. मात्र विविध ठिकाणी पुनर्वसन केलेल्या दिव्यांगांकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. अशांना सेवेत कायम करून किमान वेतन लागू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.









