राज्य उच्चशिक्षण खाते सरकारी प्रथम दर्जा कॉलेज नोकर संघातर्फे आंदोलन
बेळगाव : उच्चशिक्षण खात्यातील सरकारी प्रथम दर्जा कॉलेजमध्ये सेवा बजावणाऱ्या डी ग्रुपमधील कर्मचाऱ्यांना नोकरीत कायमस्वरुपी करून किमान वेतन देण्यात यावे, या मागणीसाठी कर्नाटक राज्य उच्चशिक्षण खाते सरकारी प्रथम दर्जा कॉलेज कर्मचारी संघटनेच्यावतीने गुरुवारी विधानसौध परिसरात आंदोलन छेडण्यात आले. विविध कॉलेजमध्ये स्वच्छता कर्मचारी आणि कार्यालयीन कामात डेटा एंट्री ऑपरेटर आणि इतर कामांसाठी सेवा देत आहेत. मात्र, मागील दहा वर्षांपासून त्यांना केवळ 2 ते 3 हजार रुपये एवढ्या तुटपुंज्या वेतनावर काम करावे लागत आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनात अडचणी येऊ लागल्या आहेत. महाविद्यालयांमध्ये काम करणाऱ्या या डी ग्रुपमधील कर्मचाऱ्यांचा ईएसआय आणि पीएफ देखील बंद झाला आहे. त्यामुळे किमान वेतनाच्या नियमानुसार पीएफ आणि ईएसआयची रक्कम दिली जात नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांसमोर अडचणी वाढू लागल्या आहेत. प्रथमश्रेणी महाविद्यालयात अकुशल कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, या कर्मचाऱ्यांना कमी वेतनावर काम करावे लागत आहे. त्यामुळे डी ग्रुपमधील कर्मचारी संकटात सापडले आहेत. त्यांना तातडीने नोकरीत कायम करून किमान वेतन देण्यात यावे, अशी मागणी केली आहे.