बालकल्याण योजनाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन
बेळगाव : समग्र शिशुविकास योजनेला कायमची मान्यता देऊन अंगणवाडी कार्यकर्त्या व सहाय्यिकांना सेवेत कायम करावे, अशी मागणी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सिटू) प्रणित राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ जिल्हा समितीने केली आहे. संघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी शुक्रवारी (दि. 15) सुवर्णसौध येथे बालकल्याण योजनाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या मागणीचे निवेदन दिले. समग्र शिशुविकास योजना (आयसीटीएस) स्थापनेला 2025 मध्ये 50 वर्षे पूर्ण होत आहेत. सुवर्णमहोत्सवाच्या उंबरठ्यावर असलेल्या या योजनेंतर्गत देशभरात अंगणवाडी केंद्रे अत्यंत जबाबदारीने व उत्कृष्टपणे कार्य करीत आहेत. कोट्यावधी बालकांचे भवितव्य घडविण्यात आयसीटीएसची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. अंगणवाडी कर्मचारीही गेल्या 5 दशकांपासून सेवाभावीपणे कार्य करीत आहेत.
आयसीटीएसला सरकारने जादा अनुदान देऊन बळकटी मिळवून द्यावी. अंगणवाडी कर्मचारी व सेविकांना सेवेत कायम करावे. ग्रॅच्यूईटीची सुविधा लागू करावी. अंगणवाडी केंद्रांना आहार पुरवठा खासगी संस्थांकडे सोपविण्याचा निर्णय सरकारने मागे घ्यावा. मुलांचे कुपोषण रोखून त्यांना पौष्टिक आहार मिळवून देण्यासाठी अर्थसंकल्पात जादा अनुदानाची तरतूद करावी. प्रसूतीकालीन रजा, बाळंतिणींसाठी सुविधा द्याव्यात. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मानधन (वेतन) देण्याची व्यवस्था करावी, अशा मागण्याही निवेदनातून करण्यात आल्या आहेत. मंदा नेवगी, जयश्री पाटील, ऊक्व्वा वडगावी, चंपा हंजी, जयमाला गंगाई आदी निवेदन देताना उपस्थित होत्या.









