देशभरात सरासरी 40 टक्के उत्पादनात घट
संतोष पाटील कोल्हापूर
भाज्यांच्या दरांत हंगामी बदल होत असून तो पचवणे कठीण झाले आहे. गेल्या दोन महिन्यांत टोमॅटोचे किरकोळ भाव मे महिन्यात 30 रुपये किलोवरून 200 रुपये किलोवर पोहोचले. गुजरात, महाराष्ट्र, तमिळनाडू आणि छत्तीसगड़ राज्यात अति उन्हाळ्याने टोमॅटोचे उत्पादन कमी झाले. गुजरातसारख्या राज्यात 23.9 टक्के आणि तमिळनाडू आणि छत्तीसगडमध्ये जवळपास 20 टक्के उत्पादनात घट झाली आहे. देशभरात उत्पादन कमी झाल्याने टोमॅटोची आवक निम्म्यावर आली आहे. चढ्या भावामुळे भाव वाढल्याने टोमॅटोचा घरगुती वापर 70 टक्के कमी झाला. होम मेनूमधून टोमॅटो पूर्णपणे काढून टाकला आहे. उत्पादन वाढले तरच गगनाला भिडलेल्या किमतीपासून दिलासा मिळेल, यातच उशीराने आलेला मान्सून आणि देशाच्या अनेक भागांमध्ये पूर आल्याने नवीन पेरलेल्या उत्पादनांची नासाडी झाल्याने टोमॅटोचा दर पुढील काही महिने चढाच राहणार आहे.
टोमॅटोसाठी रब्बी पिकाचा हंगाम डिसेंबर-जून असतो. या हंगामात देशात टोमॅटोचे उत्पादन 2021-22 मध्ये 20.7 कोटी टन होते. यामध्ये 0.4 टक्के घट होऊन 2022-23 मध्ये ते 20.1 कोटी टन इतके कमी झाले आहे. उन्हाळ्यातील उष्मा आणि अनियमित पावसामुळे टोमॅटो पिकावर परिणाम झाला असेल आणि त्यामुळे भावात अचानक वाढल्याचा अंदाज आहे. जुलै-नोव्हेंबरमध्ये पिकांची आवक कमीच राहणार आहे. इंधनाच्या किंमती वाढल्याने वाहतूक महाग होत आहे, ज्याच्या एकत्रित परिणामाने ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. खाद्यपदार्थांच्या महागाईत भाज्यांच्या किमती मे महिन्यातील 3.35 टक्क्यांवरून जूनमध्ये 4.63 टक्क्यांवर गेल्या. किरकोळ महागाई, मे महिन्यात 4.3 टक्के होती 20 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर घसरली होती, ती जूनमध्ये 4.8 टक्क्यांवर पोहोचली आहे. जून, सप्टेंबर, नोव्हेंबरमध्ये भाज्यांच्या किंमती वाढलेल्या असल्याचे आकडेवारी दर्शवते.
कुठे किती पिकतो टोमॅटो..!
भारतात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या काही भागांमध्ये रब्बी हंगामात टोमॅटोचे पीक घेतले जाते. जे सहसा नोव्हेंबरच्या मध्यात पेरले जाते आणि एप्रिल-मेमध्ये त्याची कापणी केली जाते. परंतु नाशिक सारख्या महाराष्ट्राच्या काही भागात आणि उत्तर प्रदेश सारख्या काही राज्यांमध्ये खरीप पीक म्हणून टोमॅटोची पेरणी केली जाते. जूनमध्ये आग्नेय मान्सूनच्या सुरुवातीपासून सुरुवात होते आणि मान्सूनचा हंगाम मागे घेतल्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये संपतो. मध्य प्रदेश (13.4 टक्के), कर्नाटक (12.6 टक्के), आंध्र प्रदेश (11.3 टक्के), गुजरात (7.2 टक्के), ओडिशा (7 टक्के), पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र (सरासरी 6 टक्के) ही सर्वात मोठी टोमॅटो उत्पादक राज्ये आहेत.
असा वाढला भाव अशी वाढली किंमत
मे महिन्यांत टोमॅटोचा सरासरी दर 30 रुपये किलो होता. ही किंमत 25 जुलै रोजी 200 रुपये किलो झाली. मागणी घटल्याने सध्या टोमॅटोचा किमान 140 रुपये किलो दर आहे. सरासरी 40 टक्के आवक कमी झाली. 2021-22 मध्ये 20.7 कोटी टन झाले होते. 2023 मध्ये 2.06 कोटी टन देशभरात उत्पादन झाले आहे.









