गेल्या 4 महिन्यातील निचतम पातळी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अन्नधान्य स्वस्त झाल्यामुळे डिसेंबरमध्ये किरकोळ महागाई दर 4 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला. सोमवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार, महागाई दर 5.22 टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीला महागाई दर 5.48 टक्के होता. तर 4 महिन्यांपूर्वी ऑगस्टमध्ये हा दर 3.65 टक्के होता. ग्रामीण महागाई 5.95 टक्क्यांवरून 5.76 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. तर शहरी महागाई 4.89 टक्क्यांवरून 4.58 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे.
महागाईच्या आघाडीवर सामान्य नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. अन्नपदार्थांच्या किमती कमी झाल्यामुळे डिसेंबरमध्ये देशाच्या किरकोळ महागाई दरात घट झाली आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) जाहीर केलेल्या सीपीआय आकडेवारीनुसार, डिसेंबरमध्ये अन्नपदार्थांमधील महागाई दर 8.39 टक्क्यांपर्यंत घसरला. हा दर नोव्हेंबर 2024 मध्ये 9.04 टक्के तर डिसेंबर 2023 मध्ये 9.53 टक्के होता.









