दलित संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
महापुरामुळे रायबाग, गोकाक, मुडलगी तालुक्यातील अनेक घरांना फटका बसला. अनेकांची घरे जमीनदोस्त झाली. त्या सर्वांना नुकसानभरपाई मिळणे गरजेचे होते. मात्र, ज्यांची घरे पडलीच नाहीत, अशा कुटुंबांना नुकसानभरपाई दिली गेली आहे. तेव्हा त्याचा पुनरसर्व्हे करावा, याचबरोबर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना तातडीने अटक करावी, यासह इतर मागण्यांसाठी कर्नाटक दलित संघर्ष समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
महापुरामुळे रायबाग व इतर तालुक्यांमध्ये घरे कोसळली. अनेक कुटुंबे उघड्यावर पडली. त्यामुळे अनेक जण संकटात आहेत. सर्व्हे करताना खरोखर ज्यांची घरे कोसळली आहेत, त्यांना नुकसानभरपाई दिली गेली नाही. इतरांनाच त्याचा लाभ देण्यात आला आहे. दलित कुटुंबांकडे तर दुर्लक्ष झाले आहे. तेव्हा त्याचा सर्व्हे करून त्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
देवराईतील त्या दलित कुटुंबाला न्याय द्या
खानापूर तालुक्यातील देवराई गावामधील एका दलित कुटुंबाबर बहिष्कार घालण्यात आला. त्यांना मारहाण करण्यात आली. संबंधितांवर गुन्हा दाखल झाला. मात्र, अद्याप त्यांना अटक करण्यात आली नाही. ही बाब अत्यंत गंभीर आहे. तेव्हा तातडीने त्याचा विचार करून त्या कुटुंबाला न्याय द्यावा, असेही या निवेदनात म्हटले आहे. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी विठ्ठल सगरमन्नावर, यशवंत मंटूर, सुनंदा बजंत्री, राजशेखर हिंडलगी, राघवेंद्र चलवादी, मंजुनाथ हरिजन, तुकाराम मादर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.









