गैरसोय होत असल्याने वारकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यासह परिसरात पांडुरंगाचे भक्त मोठ्या प्रमाणात आहेत. प्रत्येकवर्षी या भक्तांची पंढरपूरला दोनवेळा वारी असते. तसेच इतर वेळीही पंढरपूरला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यासाठी बेळगाव-पंढरपूर थेट रेल्वेसेवा सुरू करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन वारकरी भक्तांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. बेळगावमधून पंढरपूरला जाण्यासाठी यापूर्वी दररोज दुपारी 2.30 वाजता थेट रेल्वेसेवा उपलब्ध होती. मात्र काही कारणामुळे ती स्थगित केली आहे. यामुळे या भागातील लाखो वारकरी भक्तांची गैरसोय झाली आहे. रेल्वे व्यवस्था नसल्यामुळे भक्तांना पंढरपूरला विठ्ठल दर्शनाला जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. व्यवस्थित बस नसल्या कारणाने वारकऱ्यांची गैरसोय होत आहे. यासाठी बंद करण्यात आलेली रेल्वे पुन्हा सुरू करावी, अशी मागणी वारकरी मंडळातर्फे करण्यात आली आहे. यावेळी बाळू केरवाडकर, अजित पाटील, राजशेखर गणाचारी, उमेश डुकरे, यल्लाप्पा शहापूरकर, रविंद्र पाटील आदी उपस्थित होते.









