- अधिवेशन 25 वरुन आले 10 दिवसांवर
- कामकामज सल्लागार मंडळाचा निर्णय
- निवडणुकांनंतर पुन्हा अधिवेशनाची विरोधकांची मागणी
प्रचंड कामकाज आटोपण्याचे सरकारसमोर आव्हान : राष्ट्रपतीपदासाठी 18 जुलै रोजी होणार मतदान : उप सभापतीपदासाठीही घ्यावी लागणार निवडणूक
प्रतिनिधी / पणजी
गोवा राज्य विधानसभेचे वर्षाकालीन अर्थसंकल्पीय अधिवेशन अखेरीस 25 दिवसांवरुन 10 दिवसांपर्यंत खाली आणले आहे. राज्यात येत्या 10 ऑगस्ट रोजी होऊ घातलेल्या पंचायत निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू केली जाणार असल्याच्या पार्श्वभूमीवर कामकाज सल्लागार मंडळाच्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या निर्णयाचे समर्थन केले तर विरोधकांनी सरकार कातडी बचाव धोरण राबवित आहे आणि विरोधकांना घाबरुन कामकाज कमी केल्याची जोरदार टीका केली आहे.
राज्य विधानसभेच्या कामकाज सल्लागार मंडळाची बैठक गुरुवारी विधानसभा प्रकल्पात झाली. बैठकीस मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सभापती रमेश तवडकर, मंत्री माविन गुदिन्हो, आमदार विजय सरदेसाई तसेच आरजीचे आमदार विरेश बोरकर व आपचे आमदारही उपस्थित होते.
अगोदर ठरल्यानुसार विधानसभेचे अधिवेशन 11 जुलै ते 12 ऑगस्टपर्यंत घेण्याचा प्रस्ताव होता मात्र राज्यात पंचायत निवडणुका 10 ऑगस्ट रोजी होणार असल्याने आणि मतदान तसेच मतमोजणी प्रक्रिया व निवडणुका संदर्भात अनेक कामे असल्याने अधिवेशनाचा कार्यकाल 25 दिवसांवरुन 10 दिवसापर्यंत म्हणजे केवळ दोनच आठवडे चालविण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मांडला व तो संमत करण्यात आला.
25 दिवसांचे कामकाज 10 दिवसांत?
विधानसभेसमोर प्रचंड कामकाज आहे. सरकारची अनेक दुरुस्ती विधेयके आहेत. शिवाय अर्थसंकल्पालाही मंजुरी द्यावयाची आहेत. अर्थसंकल्पीय मागण्या तसेच विनियोग विधेयक सादर करावयाचे आहे. कामकाज एवढे प्रचंड आहे की दररोज कामकाज आटोपेपर्यंत रात्री 2 वाजतील. अर्थसंकल्पावरील चर्चाही अत्यल्प वेळेत पूर्ण करणे हे देखील फार मोठे आव्हान आहे.
उपसभापतीपदाची निवडणूक
या दरम्यान, सध्या रिक्त असलेल्या उपसभापतीपदासाठी देखील निवडणूक घ्यावयाची आहे. भाजपने अद्याप उपसभापती निश्चित केलेला नाही. कदाचित हे पद गणेश गावकर यांना दिले जाण्याची शक्यता आहे.
राष्ट्रपतीपदाची निवडणूक 18 रोजी
सोमवारी दि. 18 रोजी राष्ट्रपतीपदासाठी विधानसभा प्रकल्पाच्या आवारात मतदान होणार आहे. काही राज्यांमध्ये विधानसभा अधिवेशनांमध्ये तो दिवस सुट्टीचा राहील. तथापि, गोव्यामध्ये मात्र अधिवेशन चालू राहील. गोव्यात 40 आमदार व तीन खासदारांना मतदान करावयाचे आहे.
पुढील अधिवेशन जास्त दिवसांचे घ्या : मायकल
विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी पत्रकारांशी बोलताना अधिवेशनाचा कार्यकाल कमी केल्याने आम्हाला सर्वांनाच त्रास होईल. असंख्य प्रश्न सभागृहात चर्चेस येणार होते. आचारसंहितेमुळे अधिवेशनाचा कार्यकाळ कमी केलेला असला तरी पुढील अधिवेशन हे जास्तीत जास्त दिवसांचे असावे, अशी मागणी आम्ही सभापतींकडे केलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी कोणतेही आश्वासन दिले नाही. सभापतींनी मात्र मौखिक आश्वासन दिले आहे, असे लोबो म्हणाले.









