व्हीटीयूची कामगिरी, व्हाट्सअॅपवर निकाल उपलब्ध
प्रतिनिधी/ बेळगाव
येथील विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाने (व्हीटीयू) बीई/बीटेक/बीप्लॅन/बीआर्च/बीएस्सी (ऑनर्स) अंतिम सेमीस्टर परीक्षेचा निकाल परीक्षा झाल्यानंतर केवळ एकाच तासात जाहीर केला आहे. संबंधित विद्यार्थ्यांच्या व्हाट्सअॅपवर निकाल पाठविण्यात आला आहे. व्हीटीयूच्या इतिहासात परीक्षेनंतर फक्त एकाच तासात निकाल जाहीर करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
शुक्रवारी दुपारी 2.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत परीक्षा झाली होती. सायंकाळी 6.30 वाजता निकाल जाहीर करण्यात आला. 2021 च्या बॅचमधील अंतिम सेमीस्टरमधील 50 हजार 321 विद्यार्थ्यांना परीक्षा झाल्यानंतर केवळ एकाच तासात निकाल उपलब्ध झाला आहे. यापूर्वी व्हीटीयूने परीक्षा झाल्यानंतर तीन तासांनी निकाल जाहीर केला होता. त्यावेळी व्हीटीयूच्या इतिहासात लवकर निकाल लागण्याची पहिलीच वेळ असे जाहीर करण्यात आले होते. तर आता व्हीटीयूने हे रेकॉर्डही मोडीत काढून परीक्षेनंतर केवळ एका तासात निकाल लावण्याचा विक्रम केला आहे. प्राध्यापकांची दूरदृष्टी, कार्यतत्परता यामुळे निकाल त्वरित लागणे शक्य झाले आहे.
2019 च्या बॅचचा शेवटच्या सेमीस्टरचा निकाल परीक्षेनंतर केवळ दोन दिवसांनी जाहीर करण्यात आला होता. या परीक्षेला 43,662 विद्यार्थी बसले होते. त्यानंतर 2020 च्या बॅचचा निकाल परीक्षा झाल्यानंतर केवळ तीन तासांमध्ये जाहीर करण्यात आला होता. या परीक्षेला 37,011 विद्यार्थी बसले होते. आता परीक्षेनंतर एक तासात निकाल उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक दिशा, रोजगार मिळविणे सुलभ झाले आहे. मूल्यमापकांच्या कार्यतत्परतेबद्दल व्हीटीयूच्या कुलगुरुंनी समाधान व्यक्त करत त्यांचे अभिनंदनही केले आहे.









