गेल्या महिन्याहून अधिक काळाच्या निवडणूक रणसंग्रामानंतर आता निकालाचा दिवस उगवला आहे. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमधून देशाच्या राज्यकर्त्यांचा निर्णय होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हॅट्रिक करणार की इंडिया आघाडी यश मिळवणार ते आज खऱ्या अर्थाने निश्चित होणार आहे. देशभरातील मतदानोत्तर चाचण्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर विश्वास दर्शवला आहे. 400 पारचा नारा पूर्ण होणार नाही हे चाचण्यांमधून समजत असले तरी गतवेळीपेक्षाही अधिक घवघवीत यश पंतप्रधानांना मिळेल असा विश्वास या चाचण्यांनी व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे या चाचण्यांना धुडकावून लावत इंडिया आघाडीने काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना 295 जागा मिळतील असा दावा केला आहे. या दोन्ही दाव्यांची खरी खोटी आता लोकांच्या समोर येणार आहे. देशातील मतदार माध्यमांच्या कृपेने दोन गटांमध्ये विभागल्याप्रमाणे दोन ध्रुवांवर दिसू लागला असून त्यामुळे एक सामान्य एकमत कोठेही होताना दिसत नाही. या उलट गावोगावी, रस्ते चौकात इतकेच नव्हे तर अगदी व्हाट्सअप ग्रुपवरसुद्धा लोक विभागले गेलेले दिसून येत आहेत. वास्तविक आपल्या विचाराचा आग्रह करताना दुसऱ्याच्या विचाराचाही सन्मान राखता आला पाहिजे ही भावना हळूहळू राजकीय क्षितिजावरूनच लोप पावत चालली आहे. मनात द्वेष धरून सध्या बहुतांश वर्गाची जी वाटचाल सुरू आहे त्यात कोणाचेही हीत नाही. लोकसभा निवडणुकीतील यशाचे प्रत्येकाचे स्वत:चे काही आडाखे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने 400 पेक्षा अधिक जागा मिळतील अशी घोषणा करताना आपल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवणे आणि सलग दहा वर्षांच्या सत्तेविरोधात वातावरण वाढू नये यासाठी केलेली मांडणी ही त्यांच्या रणनीतीचा मुख्य भाग होती. त्याच पद्धतीने मोदी यांनी मुद्दा कोठेही भरकटवला तरी त्यांना जनतेच्या प्रश्नावर आम्ही बोलते करू अशी भूमिका विरोधकांनी मांडली होती. निवडणुकीचे पडघम वाजू लागले तेव्हा राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आघाडीने दिलेल्या अजेंड्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यक्त होऊ लागले. त्यामुळे मोदी प्रथमच विरोधकांच्या अजेंड्यावर व्यक्त होत आहेत अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. त्यानंतर विरोधकांच्या अजेंड्यावर या देशातील हिंदूंची मालमत्ता इतरांना वाटण्याचा विषय असल्याची भूमिका त्यांनी मांडली आणि त्यावर चर्चा सुरू झाली. विरोधक अनेकदा त्यांनी मांडलेल्या मुद्यांवरच बोलते झाल्याचे दिसून आले. हा शह काटशहाचा खेळ राजकारणात सुरूच असतो. मात्र राजकारणी जी भूमिका जनतेसमोर मांडत असतात ती भूमिका विवेकाने आणि विचारपूर्वक समजून घेणे आणि त्यामागील मर्म जाणून आपली भूमिका ठरवणे आवश्यक असते. चारशे पार सत्ताधारी आघाडी पोहोचण्याचा विचार करत असली तरी प्रत्यक्षात हिंदी भाषिक पट्ट्यात त्यांनी जितके परमोच्च यश मिळवायचे तेवढे मिळवून झाले आहे, आता त्यांच्या विरोधात वातावरण निर्माण होऊ लागले असून त्यांच्या हक्काच्या मतपट्ट्यात विरोधी आघाडीलासुद्धा चांगले स्थान मिळेल आणि गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा चांगली कामगिरी इंडिया आघाडी करेल असा विश्वास हिंदी भाषिक पट्ट्यातील प्रादेशिक नेते आणि काँग्रेसचे नेते व्यक्त करत होते. अखिलेश यादव आणि राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्या सभांना उत्तर प्रदेशात जसा प्रतिसाद लाभला तसाच प्रतिसाद हेलिकॉप्टरने फिरणाऱ्या बिहारचे युवा नेते तेजस्वी यादव यांनासुद्धा लाभला. त्यांच्या हेलिकॉप्टरची दखल पंतप्रधानांनी घेऊन निवडणुकीनंतर या हेलिकॉप्टरमधून फिरणाऱ्या आणि नोकरीच्या बदल्यात जनतेची जमीन स्वीकारणाऱ्याला धडा शिकवला जाईल असा शब्द त्यांनी बिहारच्या जनतेला दिला. अशाच पद्धतीने प्रत्येक राज्यात प्रादेशिक नेतृत्वाला शिंगावर घेण्याचे काम मोदी यांनी केले. कारण, या निवडणुकीत राष्ट्रीय मुद्दा चर्चेला नव्हता आणि स्थानिक मुद्यांवर निवडणूक होणार असेल तर प्रादेशिक नेतृत्वाला विरोध करण्याची भूमिका मोदी यांनी मांडली ती कितपत यशस्वी होते ते सुद्धा आज समजेल. त्यातही उत्तर भारतात चित्र कसे राहते, पूर्वी इतकेच यश मोदी पुन्हा मिळवतात की विरोधक त्यामधून वाट काढून आपल्या जागा वाढवतात हे समजण्याची वेळ आली आहे. मतदानोत्तर चाचण्यांमधून असे आव्हान निर्माण होईल असे दिसत नाही. तरीसुद्धा विरोधकांच्या प्रचाराच्या धडाक्यामुळे येथे काय होते याकडे देश लक्ष लावून आहे. नेमकी या उलट स्थिती दक्षिणेत आहे. दक्षिणेत मोदी यांचे अस्तित्व फारसे नाही आणि सध्या त्यांचे प्रयत्न सुरू असले तरी त्यांना यश मिळणार नाही असा दावा इंडिया आघाडी करत होती. त्याला छेद देण्याचे काम निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी केले. किशोर यांच्या मते पश्चिम बंगाल आणि ओडिसामध्ये भाजपला चांगले यश मिळेल. आंध्र, तामिळनाडू आणि तेलंगणामध्ये सुद्धा त्यांचे अस्तित्व दिसेल, बिहारमध्ये विरोधी आघाडीची डाळ शिजणार नाही अशी भूमिका प्रशांत किशोर यांनी मांडली होती. यावर त्यांचा व पत्रकार करण थापर यांचा वाद झडला. भारतीय निवडणुकांचे सर्वसामान्य जनतेला ज्ञात असणारे पहिले विश्लेषक योगेंद्र यादव यांनी प्रशांत किशोर यांच्या भूमिकेला छेद दिला. प्रशांत किशोर यांची भूमिका वास्तवाला धरून नाही. आपणही पूर्वाश्रमी याच व्यवसायात होतो. जनतेच्या मनात मोदींना सत्तेवर आणायचे नाही असा दावा यादव यांनी करताना माध्यमांकडून वेळोवेळी केले जाणारे मोदी यशाचे दावे कसे बदलत गेले याचा अभ्याससुद्धा त्यांनी मांडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बहुमत मिळणार नाही, इंडिया आघाडी सत्तेचा दावेदार होऊ शकतो असा दावा त्यांनी केला. आता सर्वांचे ऐकून झाले. पण, जनता काय म्हणते, तो आवाज येणार आहे ईव्हीएममधून. त्यामुळे ईव्हीएम काय म्हणतो हे आता महत्त्वाचे!








